खंडित विजेमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम

खंडित विजेमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम

Published on

रोहा, ता. १० (बातमीदार) ः वळीवाच्या पावसाने रोहे शहरासह ग्रामीण भागाला पार झोडपून काढल्यानंतर काही भागांतील जनजीवन विस्कळित झाले होते. वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोलाड व डोलवहाळ परिसराला चांगलाच फटका बसला. डोंगर आणि दुर्गम भागातील विजेचे खांब कोसळल्‍याने तसेच विद्युत वाहिन्यांवर फांद्या पडल्‍याने वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले.
डोलवहाळ धरणातून रोहे शहराला पाणीपुरवठा केला जात आहे; मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनिश्चित काळासाठी रोहे-अष्टमीकरांना पिण्याचे पाणी कमी दाबाने पुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी जाहीर पत्रकाद्वारे केले आहे. तर दुसरीकडे दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना खंडित विजेबरोबरच जलसंकटाचाही सामना करावा लागतो.
रोहे तालुक्याला बिगर मौसमी पावसाने चांगलाच दणका दिला आहे. वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब, वाहिन्या व विद्युत रोहित्र निकामी झाल्याने काही भागातील लोकांना संपूर्ण रात्र अंधारात, उकाड्यात काढावी लागली. तर दुसरीकडे देखभाल-दुरुस्‍तीच्या नावे दर मंगळवारी दिवसभर शटडाऊन घेऊनही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्‍याने नागरिकांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडपासून हाकेच्या अंतरावर डोलवहाळ गाव आहे. या गावाजवळ असलेल्या डोलवहाळ धरणातून रोहे अष्टमी शहराला पाणीपुरवठा केला जाते. डोलवहाळ पंपहाउस पाणलोट क्षेत्रात सलग दोन दिवस विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासहित पावसाने थैमान घातले होते. रोहे शहर आणि अष्टमी गावाला पाणीपुरवठा करणारा डोलवहाळसारख्या ग्रामीण व दुर्गम भागात पंपहाउस असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे रोहे-अष्टमी शहराला डोलवहाळ पंपहाउस येथून येणारे पाणी कमी प्रमाणात अवेळी व कमी दाबाने येते. पुढील काही दिवस शहरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे, त्‍यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी नागरिकांना केले आहे.

डोलवहाळ धरण क्षेत्र दुर्गम भागात असल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्यात विद्युत खांब कोसळणे, वीजवाहिन्या तुटणे, लोंबकळणे आदी अडचणी येतात. चार दिवसांपूर्वी पावसाने थैमान घातल्याने वीजवाहिन्या व खांब पडल्याने पुरवठा खंडित झाला होता. दुरुस्‍तीची कामे सुरू असून शहरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
- अजयकुमार एडके, मुख्याधिकारी, रोहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com