ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदीप चंद्रा यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदीप चंद्रा यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
गीतकार जावेद अख्तर आणि अनुपम खेर यांची उपस्थिती
मुंबई, ता. ११ : ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदीप चंद्रा यांचे छायाचित्र प्रदर्शन ‘बॉम्बे थ्रू द आईज ऑफ प्रदीप चंद्रा’ जुहूमधील फ्लोअर वन येथे भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात चित्रपट, संगीत, कला, साहित्य, व्यवसाय आणि राजकारण क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींचे त्यांनी टिपलेले उल्लेखनीय क्षण मांडण्यात आले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन गीतकार जावेद अख्तर आणि अनुपम खेर यांच्या हस्ते झाले. या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये निर्माता आनंद पंडित, समाजसेवक डॉ. अनील काशी मुरारका, अभिनेते दीपक काझीर आणि दीपक पराशर, कलाकार प्रकाश बाळ जोशी, चरण शर्मा आणि विनोद शर्मा, कलाप्रेमी परवेज दमानिया, क्युरेटर किसलय वोरा आणि इतर अनेक मान्यवरांचा समावेश होता. हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी २१ मेपर्यंत खुले राहणार आहे.
या वेळी जावेद अख्तर म्हणाले, की आपण सगळ्यांनाच माहीत आहे, की तो आपल्या कामात किती उत्तम आहे. या फोटोंमध्ये जे लोक तरुण दिसत आहेत, त्यातले अनेक आता तरुण राहिलेले नाहीत. हे फोटो जवळपास ३०-४० वर्षांपूर्वीचे आहेत आणि वहिदा रहमान यांचा फोटो कदाचित ६० वर्षांपूर्वीचा असावा. जेव्हा हा चित्रपट आला होता, तेव्हा मी २० वर्षांचाही नव्हतो. मी बहुतेक १७-१८ वर्षांचा असेन. इतक्या वर्षानंतरही या क्षेत्रात कायम राहणे सोपे नाही. मी त्याला शुभेच्छा देतो आणि आशा करतो, की तो नेहमीप्रमाणे असेच सुंदर क्षण टिपत राहो. तर अनुपम खेर म्हणाले, प्रदीप हा एक आयकॉनिक फोटोग्राफर आहे. माझ्या स्ट्रगलच्या दिवसांपासून आजपर्यंत, तो काहीच बदललेला नाही. ना दिसण्यात, ना विचारात. त्याच्या फोटोंवरून कळते, की तो फक्त चेहराच नाही, तर आत्माही टिपतो. फक्त ग्लॅमर नव्हे आणि ते खूपच आश्चर्यकारक आहे. मी येथे येऊ शकलो याचा मला खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपटसृष्टीचा झगमगाट असो वा मुंबई दंगलींचा गोंधळ किंवा कमाठीपुऱ्यातील निरागस मुलांचे शांत जीवन... प्रत्येक फ्रेममध्ये मानवी भावना आणि वास्तवाचे दर्शन घडते. गुरगाव येथील म्युझिओ कॅमेरा सेंटर फॉर फोटोग्राफिक आर्ट येथे सुरू झालेले हे भ्रमंती प्रदर्शन ‘बॉम्बे थ्रू द आईज ऑफ प्रदीप चंद्रा’ आता मुंबईत दाखल झाले आहे. या छायाचित्रांमधून अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकणारे क्षण जिवंत होतात. कला आणि साहित्य क्षेत्रात एम. एफ. हुसेन, एस. एच. रझा, एफ. एन. सूझा, बोस कृष्णमाचारी आणि लेखिका-स्तंभलेखिका शोभा डे यांची छायाचित्रेही प्रदर्शनाचा भाग आहेत. भारतीय उद्योग आणि नेतृत्वाचे प्रतीक रतन टाटा, धीरूभाई अंबानी, तसेच राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे आणि एल. के. अडवाणी यांचेही फोटो या खास प्रदर्शनात पाहायला मिळतात. फिल्म निर्माता आनंद पंडित आणि माध्यम क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व प्रितीश नंदी यांचादेखील यात समावेश आहे.
..........................
प्रदर्शनाविषयी बोलताना प्रदीप चंद्रा म्हणतात, हे प्रदर्शन फक्त एक कार्यक्रम नाही, तर माझ्यासाठी एक घरी परतण्यासारखे आहे. माझ्या आयुष्यातील मेहनत, आवड आणि आठवणी यांचं हे प्रतीक आहे. प्रत्येक छायाचित्रामागे एक कथा आहे आणि त्या सगळ्या मिळून माझ्या जीवनप्रवासाचं प्रतिबिंब दाखवतात. हे प्रदर्शन त्यांचे गुरू, दिवंगत प्रितीश नंदी यांना समर्पित आहे. ज्यांचे या वर्षी सुरुवातीस हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रितीश हे दृश्यकलेचे सामर्थ्य ओळखणारे पहिले व्यक्ती होते. त्यांनीच मला फ्रेमच्या बाहेर पाहण्यास शिकवले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझे फक्त करिअर नाही तर माझे जग पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला, असे ते नमूद करतात.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.