डिसेंबरची अंतिम मुदत
जेजे सुपरस्पेशालिटीचे काम संथगतीने
डिसेंबरची अंतिम मुदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : राज्य सरकारअंतर्गत येणाऱ्या जेजे रुग्णालय परिसरात तयार केल्या जाणाऱ्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम २०२३ मध्ये पूर्ण होणार होते; मात्र ते अद्याप अपूर्ण आहे. पाच वर्षांत एका विंगचे कामही पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत केवळ ७० टक्के काम झाले आहे. खोदकामात मोठ्या दगडांची अडचण आणि मध्येच आलेली कोरोना महामारी ही मुख्य कारणे देत काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने एक वर्षाची मुदत वाढवून घेतली होती. तरीही अद्याप काम रखडले आहे. २०२३ची मुदत संपल्यानंतर कंत्राटदाराने पुन्हा एकदा सहा महिन्यांची मुदत आणखी वाढवून मागितली होती; पण सातत्याने या इमारतीच्या बांधकामाला उशीर झाला आहे. याचा परिणाम या इमारतीच्या बांधकामाच्या आर्थिक गणितावरही झाला आहे. विशेष म्हणजे, कामाला दिरंगाई होऊनही शासनाने ठेकेदारावर कोणतीही दंडात्मक कारवाई केलेली नाही.
....................................
२०१९ मध्ये भूमिपूजन
जेजे रुग्णालय संकुलात सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी हा तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचा सर्वात खास प्रकल्प होता. सन २०१० मध्ये नवीन रुग्णालयाचे नियोजन करून तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी काम जलदगतीने सुरू केले होते. २०१४ मध्ये भाजपचे सरकार आल्यावर महाजन यांनी या प्रकल्पाला सर्व मंजुरी दिली होती. सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन २०१९ मध्ये झाले आणि जुलै २०२० मध्ये वर्कऑर्डर देण्यात आली. कंत्राटदाराला ३६ महिन्यांत काम पूर्ण करायचे होते; परंतु ठेकेदार वेळेत काम पूर्ण करू शकला नाही.
......................................
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की जेजे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम कोरोना महामारीच्या आधीच सुरू झाले होते; पण कोविड लॉकडाऊनमुळे काम थांबले. काम सुरू केल्यानंतर झाडे तोडण्यास आणि जुन्या इमारती पाडण्यास परवानगी मिळण्यास वेळ लागला. यासोबतच खोदकाम सुरू असताना मोठा दगड मार्गात आला, तो फुटण्यास वेळ लागला. हा रुग्णालयाचा परिसर असल्याने दगड फोडण्यासाठी स्फोटांचा वापर करता येत नव्हता.
.......................................
कारवाईऐवजी वाढीव मुदत
तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनीही त्यांच्या कार्यकाळात या कंत्राटदारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी या पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांनीदेखील अनेकदा या इमारतीच्या बांधकामांची पाहणी केली आहे; पण वाढलेल्या मुदतीविषयी कंत्राटदारावर कोणीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.
......................................
जेजे रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला ही डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे; पण या कंत्राटदाराने आता डिसेंबरपर्यंतची मुदत मागितली आहे. कारण वॉर्ड्सला स्थलांतरित करून तिकडे यंत्रसामग्री टाकण्यासाठी तेवढा वेळ लागू शकतो, असे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. गेल्या पाच वर्षांत ३७,१४९ कोटी रुपये खर्च वाढवला गेला आहे. २०२० मध्ये हा खर्च ४०७.१६ कोटी होता, आता तो ७७८.७५ कोटीपर्यंत गेला आहे.
..................................
१,२०० खाटांचे रुग्णालय
सुपरस्पेशालिटी रुग्णालयात १,२०० खाटा असणार आहेत. १० मजल्यांच्या इमारतीत दोन बेसमेंट असतील. सर्व व्हीआयपी वॉर्डसह हृदय, न्यूरोसर्जरी, बालचिकित्सा, यूरोलॉजी, ग्रॅस्ट्रो असे सर्व अनेक सुपरस्पेशालिटी विभाग असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.