टेम्पोमध्ये अन्नपदार्थ विक्रेत्यांचे पेव

टेम्पोमध्ये अन्नपदार्थ विक्रेत्यांचे पेव

Published on

वाशी, ता. १४ (बातमीदार) : नवी मुंबईतील पदपथावर, रस्त्यावर गाडे लावून बेकायदा अन्नपदार्थ विक्रेत्यांची गर्दी वाढत असताना आता काहींनी टेम्पो लावून त्यामध्ये खाद्यपदार्थांची विक्री सुरू केली आहे. महापालिकेच्या होणाऱ्या कारवाईमुळे अन्नपदार्थ विक्रेत्यांनी नवीन शक्कल काढत तीनचाकी व चारचाकीमध्ये (टेम्पो) व्यवसाय थाटले आहेत. रस्त्याच्या मध्येच किंवा चौकात लावण्यात येणाऱ्या टेम्पोमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे कुठेही बिनधास्तपणे टेम्पो पार्क करून अन्नपदार्थविक्री करण्यात येत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रहदारीच्या ठिकाणी, बसस्थानकाच्या बाजूला, रेल्वेस्थानकानजीक अनधिकृतपणे रस्त्यावर अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पालिका कारवाई करते. यामुळे अन्नपदार्थ विक्रेत्यांनी नवीन शक्कल काढली असून, टेम्पोमध्ये अनधिकृतपणे सिलिंडरसारखे स्फोटक पदार्थ ठेवून अन्नपदार्थ बनवतात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची भीती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनधिकृतपणे टेम्पोमध्ये अन्नपदार्थविक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई केली असता, मुजोरपणे पुन्हा विक्री करण्यात येते. त्यामुळे पालिकेचा अतिक्रमण विभाग हतबल झाला आहे. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, जुईनगर, सीबीडी बेलापूर, तसेच औद्योगिक पट्ट्यामध्ये मोबाईल कँटीन सुरू आहे. वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी वाहन पार्क करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
------------------------
अनधिकृतपणे टेम्पोमध्ये ज्वलनशील पदार्थ ठेवून विक्री करत असल्यास अशा गाड्यांवर अन्नपदार्थ सुरक्षा व फायर सेफ्टी कायद्यानुसार कारवाई करण्यात येते. टेम्पोमध्ये असणारे सिलिंडर यासारखे ज्वलनशील साहित्य जप्त करण्यात येते. संबंधित वाहनांवर दंडही आकारला जातो.
- भागवत डोहिफोडे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका
-------------------------
आरटीओमधून टेम्पोला मोबाईल कँटीन म्हणून परवानगी देण्यात येते; परंतु टेम्पो कोठे उभा करून व्यवसाय करायचा याबद्दल परवानगी देण्यात येत नसून अनधिकृतपणे कोठेही व्यवसाय करत असल्यास, तसेच टेम्पोमध्ये ज्वलनशील पदार्थ बाळगल्यास पालिकेने अशा वाहनावर कारवाई करावी. आरटीओची परवानगी न घेता टेम्पोमध्ये बदल केला असल्यास त्यावर आरटीओ कारवाई करेल.
- गजानन गावंडे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com