प्रतिकूल परिस्थितीत आकाशाला गवसणी

प्रतिकूल परिस्थितीत आकाशाला गवसणी

Published on

प्रतिकूल परिस्थितीत आकाशाला गवसणी
श्रद्धा गायकवाड
ठाणे, ता. १४ : दहावी शालांत परीक्षेचा निकाल लागला आहे. कुणाला अपेक्षित तर कुणाला अनपेक्षित यश-अपयश मिळाले आहे, पण यशाला गवसणी घालणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये असेही काही हिरे आहेत, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले ध्येय साध्य केले आहे. यामध्ये कुणी झोपडपट्टीतील विद्यार्थी आहेत, तर कुणी घरकाम करणाऱ्या पालकांचे पाल्य आहेत, तर कुणाच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले आहे. महागड्या शिकवण्या नाहीत, नामांकित शाळा नाही की घरात अभ्यासासाठी अनुकूल वातावरण नाही, पण नशिबाला दोष न देता या विद्यार्थ्यांनी ‘एकलव्या’प्रमाणे आपले ध्येय साधले आहे. अशा यशस्वी विद्यार्थ्यांची ही यशोगाथा...

सेजल मतेची फिनिक्स भरारी
ठाण्याच्या सेजल मते या विद्यार्थिनीने ठाण्यातील मो. ह. विद्यालयातून दहावीच्या परीक्षेत ९०.४० टक्के गुण मिळवत तिच्या मेहनत आणि चिकाटीचा दाखला दिला आहे, पण सेजलचा प्रवास हा सरळ नव्हता. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे अचानक निधन झाले अन् कुटुंबावर दुःखाचे मोठे सावट आले. यातून सावरत तिने अभ्यासाला सुरुवात केली, पण इयत्ता दहावी गाठताना तिला अपेक्षित यश मिळत नव्हते. सुरुवातीच्या काळात सराव परीक्षांमध्ये कमी गुण मिळाले, तेव्हा तिच्या डोळ्यासमोर केवळ आईची सुरू असलेली धडपड दिसत होती. घर आणि नोकरी सांभाळत आईचा होणारा त्रास दिसत होता. हीच तिची खरी ताकद ठरली आणि तिने फिनिक्स भरारी घेतली.
दोन वर्षांपूर्वी सेजलच्या वडिलांचे अकाली निधन झाले. यातून सावरत तिच्या आईने महापालिकेत नोकरी करत सेजलला घरात शिकण्यासाठी उत्तम वातारवण देण्याचा प्रयत्न केला. आईला हातभार लावण्यासाठी घरकाम आणि अभ्यास यांच्यात सेजलने समतोल साधला. तिने सुरुवातीलाच आपले ध्येय ९० टक्के ठरवले होते. त्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन केले. तिला तिच्या शिक्षक, मित्रमैत्रिणींनी आणि नातेवाइकांनीही योग्य ते मार्गदर्शन आणि पाठिंबा दिला.
सेजलने दहावीच्या कालावधीत मोबाइल, समाजमाध्यम आणि गरज नसलेल्या भेटीगाठीपासून दूर राहणे पसंत केले. या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी अभ्यासात अडथळा ठरत होत्या. सुरुवातीला काही विषयांमध्ये तिला अपेक्षित निकाल मिळाला नाही, पण त्यावर तिने आत्मपरीक्षण केले. चुका ओळखल्या आणि नव्याने तयारी करत उत्तम यश मिळवले. तिने तिच्या पुढील शिक्षणासाठी इंजीनिअरिंग क्षेत्रामध्ये जाण्याचे ठरवले आहे.


रिक्षाचालक वडिलांचे कष्ट, बहिणीची प्रेरणा
वडील रिक्षाचालक असल्याने घराची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, पण त्या परिस्थितीतही बहिणीने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळवले. नेमकी हीच प्रेरणा घेत ठाण्यातील राबोडी फ्रेण्ड सर्कल उर्दू हायस्कूलचा विद्यार्थी निजामुद्दीन शेख याने दहावीच्या परीक्षेत ९१.४० टक्के गुण मिळवले आहे.
निजामुद्दीनचे वडील रिक्षा चालवण्याचे काम करतात. रोजच्या कमाईवर पोट असतानाही त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. म्हणूनच निजामुद्दीनच्या मोठ्या बहिणीने दहावीत मिळवलेले ९० टक्के गुण मिळवले. तिच्या यशाकडे पाहूनच त्याने आपले दहावीचे ध्येय ठरवले आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली.
निजामुद्दीनने दहावीच्या काळात कोणतीही ‘नॉन-स्टॉप’ स्टडी न करता, इतर दिवसांप्रमाणेच नियमित अभ्यासावर भर दिला. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवणे, बाजारात उपलब्ध असलेल्या प्रश्नसंचांचा अभ्यास करणे यावर त्याचा भर होता. त्याने अभ्यासात मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले. आपल्या या यशाबद्दल निजामुद्दीन म्हणतो की, स्वतःवर विश्वास ठेवा खरी सुरुवात तिथूनच होते. मी क्लासमध्ये सर्वात हुशार विद्यार्थी नव्हतो, पण मी माझ्या अभ्यासात सातत्य ठेवले, वेळेचे योग्य व्यवस्थापन केले आणि कधीही निराश झालो नाही, असे म्हणत त्याने आपल्या यशाचे गुपीत उलघडले.

संघर्षातून मिळवले यश
घरातील आर्थिक अडचणी, वडिलांचे अचानक निधन शिक्षणाची जबाबदारी आणि भावनिक संघर्ष. अशा अनेक आव्हानांचा सामना करत ठाण्यातील जान्हवी पाटील हिने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत ७३ टक्के गुण मिळवले आहे. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे अचानक निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे आणि जबाबदाऱ्यांचे ओझे आले. त्या वेळी जान्हवीची आई आणि मोठी बहीण दोघींनी मिळून परिस्थितीला धैर्याने सामोरे जात घर आणि शिक्षण दोन्ही सांभाळले. जान्हवीची बहीण टेलरिंगचा व्यवसाय करते आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर घर चालते. या परिस्थितीतही जान्हवी आणि तिच्या बहिणीचे शिक्षण सुरू राहिले.

आर्थिक परिस्थितीमुळे जान्हवीला शिकवणीत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे शाळेतील नियमित उपस्थितीतून आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून अभ्यास करत आपली तयारी चालू ठेवली. दहावीच्या वर्षात तिच्या अभ्यासात अडथळा येऊ नये म्हणून स्वयंपाक, घरकाम आणि इतर सर्व जबाबदाऱ्या आई आणि बहिणीने उचलल्या. जान्हवीने अभ्यासात सातत्य ठेवत वेळेचे योग्य नियोजन केले आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तिने मोबाइल आणि सोशल मीडियापासून दूर राहून अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. जान्हवीच्या मते परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्याला दोष देण्यापेक्षा आहे ते स्वीकारून पुढे जायला शिकले पाहिजे. मी अडचणींचा विचार न करता अभ्यासावर लक्ष दिले. यामागे माझ्या आईचं बळ आणि बहिणीची साथ हाच मुख्य आधार होता असे ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com