दाखल्यांना महागाईचा फटका

दाखल्यांना महागाईचा फटका

Published on

जव्हार, ता. १५ (बातमीदार) : दुर्गम भागातील नागरिकांचे राज्य, केंद्र सरकार आणि सामाजिक संस्थांच्या निरनिराळ्या योजनेमुळे जीवनमान उंचावू लागले आहे. कोणत्याही योजनेकरिता सरकारी दाखले अनिवार्य आहेत, मात्र सरकारी दाखल्यांचे दर दुप्पट झाल्याने येथील आदिवासी नागरिक हवालदिल झाला आहे.

आपले सरकार सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्राचे चलन शुल्क दुपटीने वाढविण्यात आले आहे. त्यामुळे रहिवासी, उत्पन्न यासह सर्व प्रकारची प्रमाणपत्रे, प्रतिज्ञापत्रे यांचे दर वाढले आहेत. शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर ही वाढ झाल्याने तालुक्यातील आदिवासी भागात मोठा फटका बसणार आहे. ही दरवाढ साडेसहा वर्षांनंतर झाली आहे.

जव्हार तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रांची स्थापना झाली आहे. या केंद्रांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र, उत्पन्न, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमिलेअर, रहिवासी आदी प्रकारचे दाखले वितरित केले जातात. काही दिवसांपूर्वी दहावी व बारावीचा निकाल लागला. त्यामुळे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांची गरज असते, शिवाय विविध प्रकारची प्रतिज्ञापत्र भरून द्यावी लागतात.

या काळात आपले सरकार केंद्र, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रामध्ये पालकांची, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र आता ऐन प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावर आपले सरकार सेवा केंद्रातील प्रमाणपत्रांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. दहावीच्या निकालानंतर पालकांना विविध दाखल्यांची गरज भासते.

नवीन शुल्क आकारणी सुरू
२००८ मध्ये एका प्रमाणपत्रासाठी २० रुपये लागत होते. वाढती महागाई, जागेचे भाडे, विजेचे देयक, संगणक व प्रिंटरची देखभाल-दुरुस्ती यामुळे दरात २०१८ मध्ये वाढ केली होती. आता सरकारने पुन्हा हे दर दुपटीने वाढविले आहेत. त्यामुळे सामान्यांना मोठा फटका बसला आहे. शहर आणि जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये वाढीव दराची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात २५ एप्रिलपासूनच नव्या दराने शुल्क आकारणी सुरू झाली आहे.

जव्हारसारख्या ग्रामीण भागात रोजगार, शिक्षण आणि दळणवळणाची मोठी वानवा आहे. त्यामुळे सरकारने या भागात विशेष बाब म्हणून ही दाखल्याची झालेली दरवाढ रद्द करून येथील आदिवासींच्या उन्नतीला चालना द्यावी.
- कल्पेश राऊत, सरपंच, कासटवाडी

नांदगाव प्रांत तारापूर येथील ग्रामपंचायतीमध्ये विद्यार्थ्यांना मोफत दाखले दिले जातात, त्याचा भार आम्ही उचलतो, शिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक किंवा नोकरीविषयक लागणारे सर्व दस्तऐवज या ठिकाणी आम्ही मोफत उपलब्ध करून देतो. त्यात सर्व प्रकारचे दाखले व विविध योजनेसाठी लागणारे प्रिंटआऊट, जन्म-मृत्यू नोंदणी दाखले दिले जातात. त्यामुळे आदिवासी जिल्ह्यात सरकारी दाखल्यांची झालेल्या दरवाढ रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार आहे.
- समीर मोरे, सरपंच, नांदगांव प्रांत तारापूर

प्रमाणपत्र सेवा दर (रुपये)
प्रमाणपत्रे जुने दर नवीन दर
जात प्रमाणपत्र ५७.२० १२८
नॉन क्रिमिलेअर ५७.२० १२८
उत्पन्न ३३.६० ६९
नागरिकत्व ३३.६० ६९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com