
अवकाळीचा कोथिंबिरीला फटका
आवक घटली; भाव वाढला
ठाणे, ता. १५ (बातमीदार) : अवकाळी पावसाचा फटका भाजीपाल्यांना बसला असून ताटातून कोथिंबीर गायब होण्याच्या मार्गावर आहे. नाशिक-पुण्यामध्ये पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे भाज्यांची आवक घटली आहे. बाजारात येणाऱ्या पालेभाज्यांचा ग्राहकांच्या पिशवीत जाईपर्यंत चिखल होत असल्याचे दिसत आहे. परिणामी, गेल्या आठवड्यात ठाण्याच्या जांभळी नाका भाजी मंडईत दहा रुपयाला मिळणारी कोथिंबीरची जुडी ३० रुपयांवर पोहोचली आहे. याचा फटका व्यापाऱ्यांसह ग्राहकांना बसत आहे.
उन्हाळ्यात अनेक जण आपल्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करतात. जेवणामध्ये कोथिंबीरशिवाय भाजीची शोभा आणि चव ही अपुरीच मानली जाते. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आता पालेभाज्यांवर बसू लागला आहे. इतर भाज्यांचे भाव स्थिर असले तरी पालेभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाव वाढले आहेत. त्यातही अर्ध्या पालेभाज्या नासत असल्यामुळे त्या फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. पुणे आणि नाशिक परिसरातून शहरात येणाऱ्या भाजीपाला मालामध्ये मोठ्या प्रमाणावर कुजलेली कोथिंबीर आढळून येत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
पावसामुळे वाहतुकीदरम्यान भाजी कुजण्यास सुरुवात होते, तसेच शेतातच ओलाव्यामुळे पाने कुजतात. परिणामी, विक्रेत्यांना निवड करताना कुजलेली कोथिंबीर वेगळी करून फेकावी लागते आणि उरलेला मालच विक्रीस ठेवावा लागत आहे. यामुळे केवळ मजुरी आणि वेळ वाया जात नाही तर आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर सहन करावे लागत आहे.
भाजीविक्रेत्यांचे म्हणणे आहे, की सध्याची परिस्थिती इतकी बिकट आहे, की आणलेली कोथिंबीर दोन दिवसही टिकत नाही. ताजी राहण्याऐवजी, लगेचच पाने सुकतात आणि कुजतात. त्यामुळे भाजीपाला खराब व्हायला सुरुवात झाली की ती लगेचच स्वस्त दरात विकावी लागते, अन्यथा ती पूर्णपणे वाया जाते. काही ठिकाणी कोथिंबीरची जुडी सडलेल्या अवस्थेतही विक्रीस ठेवली जात आहे, जेणेकरून संपूर्ण तोटा टाळता येईल.
फक्त कोथिंबीरच नव्हे, तर मेथी, शेपू, पालक या पालेभाज्यांच्याही दरात कमालीची वाढ झाली आहे. बाजारात या भाज्यांची आवक घटल्याने ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. भेंडी आणि गवार या हिरव्या भाज्यांचाही भाव वाढलेला आहे. यामुळे सामान्य ग्राहकांच्या जेवणात भाज्यांचे प्रमाण कमी होत असून दररोजचा खर्च वाढतो आहे. शेतकरीसुद्धा पावसामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. ओलाव्यामुळे पालेभाजी खराब होते, त्यात वाहतूक अडथळ्यांमुळे वेळेत बाजारात पोहोचत नाही. परिणामी, संपूर्ण वितरण साखळी कोलमडलेली असून त्याचा परिणाम थेट बाजारात दिसतो आहे.
विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान
पावसाची ही अनपेक्षित झळ केवळ ग्राहकांवरच नव्हे तर शेतकरी आणि विक्रेत्यांनाही आर्थिकदृष्ट्या अडचणीत टाकणारी ठरली आहे. पालेभाज्यांची आवक घटली असून जो माल येत आहे तो एक दिवसही टिकत नाही. अर्धी भाजी फेकण्यात वाया जात आहे. ग्राहकाकडूनही तशीच तक्रार ऐकायला येत आहे, अशी प्रतिक्रिया भाजीविक्रेत्या सुंदरा माळी यांनी दिली.
भाज्यांचे भाव
पूर्वी- शेपू २० रु. जुडी, मेथी १५ रु. जुडी, वांगी ५० रु. किलो
कोथिंबीर १० ते १५ रु. जुडी
आता - (पावसानंतर) शेपू ३० रु. जुडी, मेथी ३० रु. जुडी, वांगी ६० रु. किलो, कोथिंबीर ३० रु. जुडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.