जिल्‍हा प्रशासनाकडून यलो अलर्ट

जिल्‍हा प्रशासनाकडून यलो अलर्ट

Published on

अलिबाग, ता. १७ (वार्ताहर) ः हवामान विभागाने दिलेल्‍या इशाऱ्यानंतर रायगड जिल्ह्यात रविवारपर्यंत (ता. १८) यलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, वीज कडकडाटासह ताशी ४० ते ५० किमी प्रती वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, काळजी घ्यावी तसेच आवश्यकता भासल्यास तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा अफवा पसरवू नये. नागरिकांनी दक्षता घ्‍यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे. विजा चमकत असल्‍यास संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतापासून वेगळे ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब राहावे. पाऊस पडत असल्‍यास आणि वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी, मच्छीमारांची धावपळ
जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून महाड, पोलादपूर तालुक्‍यात काही दिवसांपासून दररोज सायंकाळी जोरदार पाऊस कोसळतो. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. यंदा पावसाचे आगमन आठवडाभरापूर्वीच होणार असल्‍याने शेतकरी, मच्छीमारांची धावपळ सुरू आहे.
दरवर्षी अंदमान-निकोबारमध्ये साधारण २० मेपर्यंत पाऊस दाखल होतो; पण यंदा आठवडाभर आधीच, १३ मे रोजी निकोबारमध्ये पाऊस दाखल झाल्यानंतर भारतीय उपखंडात वेगाने सरकू लागला आहे. याचे पडसाद सध्या कोकण किनारपट्टीवर दिसून येत असल्‍याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.

समुद्र खवळण्याची शक्‍यता
पुढील तीन-चार दिवसांत, वादळी वारे आणि समुद्र खवळण्याची शक्‍यता असल्‍याचा अंदाज अलिबाग मच्छीमार संस्थेचे उपाध्यक्ष सत्यजित पेरेकर यांनी व्यक्त केला. त्यामुळे जिल्‍ह्यातील बंदरांमध्ये पावसाळापूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. नौका बंदरात सुरक्षित नांगरून ठेवण्यात येत आहेत. मांडवा, वरसोली, आक्षी, आगरदांडा, जीवनाबंदर येथे हवामान बदलाचे पडसाद स्पष्ट दिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com