नवी मुंबई पालिकेचा डेंगीला हरवण्याचा निश्चय
नेरूळ, ता. १७ (बातमीदार) : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शुक्रवारी (ता. १६) ‘राष्ट्रीय डेंगी दिवस’ साजरा करण्यात आला. ‘तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा : डेंगीला हरविण्याचे उपाय करा’ असे यंदाच्या डेंगीदिनाचे घोषवाक्य जाहीर करण्यात आले आहे. त्यास अनुसरून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जनतेमध्ये डेंगीविषयी जागरूकता निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंगीदिन साजरा करण्यात येतो. या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात येते. यावर्षीदेखील शुक्रवारी राष्ट्रीय डेंगीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये नागरिकांना ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने, तसेच डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून, घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने दाखवून जनजागृती करण्यात आली.
-----------------
८४४ रक्ताचे नमुने तपासणीसाठी
डेंगी आजारावर मात करायची असेल तर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांसोबतच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे, ही बाब नागरिकांना समजून सांगण्यात आली. या शिबिरांना ७,४५५ नागरिकांनी भेट दिली असून, ८४४ रक्ताचे नमुने घेण्यात आले.
----------------------
आठवडाभर जनजागृतीपर पथनाट्ये
राष्ट्रीय डेंगीदिनानिमित्त १६ ते २१ मे या कालावधीमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सर्व कर्मचारी व फवारणी कामगारांची, तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांची सभा घेण्यात येणार आहे. जनजागृतीच्या दृष्टीने १६ ते २४ मे २०२५ या कालावधीत सायंकाळी सहा ते आठ या वेळेत गर्दीच्या ठिकाणी, झोपडपट्टी भागात, चौकात, बाजारपेठेच्या आवारात अशा विविध जागी ३१ जनजागृतीपर पथनाट्ये सादरीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. याद्वारे डेंगी आजाराची कारणे, आजाराची लक्षणे व उपाययोजना यावर जनजागृती करण्यात येणार आहे.
-----------------
डेंगीसाठी कारणीभूत एडीस डासांची उत्पत्ती घरांमध्ये व घराभोवताली स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी सर्व पाण्याचे साठे झाकून ठेवावेत. पाणी साचण्याचे संभाव्य ठिकाण असणारे घराबाहेरील/टेरेसवरील भंगार साहित्य नष्ट केले तर नवी मुंबईत डेंगी आजारावर आळा घालणे शक्य होईल. डेंगीला हरविण्याच्या मोहिमेत नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.