झोपडपट्टीतील मुलांसाठी ‘फौजी की पाठशाला’
नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : कचरावेचक महिलांच्या मुलांसाठी कळवा, दिघा, रबाळे, इंदिरानगर, बोनसरी, पनवेल या भागांतील वस्ती पातळीवर सुरू असलेल्या अभ्यास वर्गातील १४ ते १८ वयोगटातील ७० मुलांसाठी ‘फौजी की पाठशाला’ या एकदिवसीय नेतृत्वगुण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उन्हाळी सुट्टीतील उपक्रमाचा एक भाग म्हणून घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत नेतृत्वगुण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
नवी मुंबईत हजारो कचरावेचक महिलांचे संघटन उभारणाऱ्या स्त्रीमुक्ती संघटनेकडून कचरावेचक महिलांच्या मुलांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. स्त्रीमुक्ती संघटनेच्या माध्यमातून नवी मुंबईतील आठ वस्त्यांमध्ये कचरावेचक महिलांच्या मुलांसाठी अभ्यासवर्ग चालवण्यात येत असून, यात ३९० मुले शिक्षण घेत आहेत. या अभ्यासवर्गातील मुलांसाठी स्त्रीमुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांच्या पुढाकाराने एकदिवसीय नेतृत्वगुण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत नेतृत्वगुण दिसलेल्या काही विद्यार्थ्यांना दूरदर्शन निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. डॉ मृण्मयी यांनी समारोपात विद्यार्थ्यांनी चिकाटी व सातत्य ठेवून आपला सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत व यशाचे शिखर गाठले पाहिजे, असे सांगितले. या दिवसभराच्या कार्यशाळेला स्त्रीमुक्ती संघटनेचे कार्यकर्ते, शिक्षक उपस्थित होते.
------------------
समूह बांधणीतील महत्त्वाचे पैलू
कार्यशाळेमध्ये कॅप्टन तनुजा काबरे, सहाय्यक श्रावणी बाळेकर व रोहित यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळांच्या माध्यमातून नेतृत्वगुण कसे जोपासावे, हे सकारात्मक पद्धतीने सांगितले. समूह बांधणीमध्ये विद्यार्थ्यांनी एकमेकांशी आदराने वागणे, संवाद करणे, दुसऱ्याचे लक्षपूर्वक ऐकणे, न घाबरता आपले मत मांडणे हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले.
---------------------
प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक
प्रथमोपचार या सत्रामध्ये अपघात झालेल्या लोकांना वाचवण्यासाठी काय करता येईल, याबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. रक्त थांबवणे, पाय फ्रॅक्चर झाला असेल तर स्ट्रेचर बनवणे याचे प्रात्यक्षिक घेतले. रुग्णवाहिका येण्यास अथवा डॉक्टरांना उशीर झाल्यास जखमी व्यक्तीला मदत करून कसे वाचवता येऊ शकते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
----------------
कठीण परिस्थितीत काय करावे?
शेवटच्या सत्रात कठीण परिस्थितीवर न डगमगता मात करण्यासाठी काय करता येईल याची माहिती देण्यात आली. स्वत:चाच फायदा न बघता इतरांनाही कसे पुढे घेऊन जाता येईल, संघटित करता येईल, एकमेकांचे कौतुक करणे, आनंद वाटून घेणे हे सर्व गप्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.