क्रीडा पंचांना मानधनाची प्रतीक्षा
संकेत सबनीस : सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. १८ : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून घेतल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांबद्दल धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गेल्या वर्षी जुलै ते डिसेंबर या कालावधीत पालिकेकडून झालेल्या ४९ क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेले पंच आणि मदतनीसांना मानधनच दिलेले नाही. मानधन न मिळालेल्या पंच व मदतनिसांची संख्या ७०० ते ७५०च्या घरात आहे. हे मानधन देण्यासाठी कागदी घोडे नाचवण्याव्यतिरिक्त एकही गोष्ट घडली नसल्याचा थेट आरोप जिल्हा कबड्डी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका असल्याने त्यांच्यातर्फे दरवर्षी क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये प्रत्येक खेळाच्या जिल्हा क्रीडा संघटनांनी अधिकृत केलेल्या पंचांचा, मदतनीसांचा समावेश केलेला असतो. त्यांना मानधन हे महापालिकेकडूनच दिले जाते. असे ४९ प्रकारचे क्रीडा प्रकार असून, जुलै ते डिसेंबर या काळात महापालिका या क्रीडा प्रकारांचे आयोजन करते. मात्र, २०२४-२५ या गेल्या शैक्षणिक वर्षात कोणत्याच क्रीडा स्पर्धांचे मानधन दिले नसल्याची बाब उघड झाली आहे. दरम्यान, हे मानधन दिले नसल्याची कबुलीही महापालिकेच्या क्रीडा विभागाने दिली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
आयुक्तांना पत्र, तरीही उशिर
कल्याण-डोंबिवली महापालिका क्रीडा स्पर्धांचे मानधन दरवर्षी खूप उशिराने देते. गेल्या वर्षीच्या कबड्डी खेळांचे मानधन अजूनही मिळालेले नाही. ऑक्टोबर २०२४ मध्ये पार पडलेल्या जिल्हा कबड्डी स्पर्धांमध्ये २२ पंच सहभागी झाले होते. त्यांना आज देतो, उद्या सांगून मानधन दिले नाही. हे मानधन मिळावे म्हणून थेट आयुक्तांना पत्र पाठवूनही कोणताही फरक पडलेला नाही. ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, मिरा-भाईंदर या सर्व महापालिका पंचांना वेळेत मानधन देतात. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिका उशिर करते, असे ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मालोजी भोसले याबद्दल बोलताना म्हणाले. या कबड्डी संघटनेचे पंचप्रमुख व सहखजिनदार बाळू उबाळे यांनीही मालोजी भोसले यांच्या बोलण्याला दुजोरा देत अद्याप मानधन न मिळाल्याचे स्पष्ट केले आहे.
खाते पडताळणीत गेला वेळ
अनुदानित खेळांचे आयोजन झाल्यावर सर्वांचे मानधन संबंधितांच्या खात्यावर दिले जाते. रोखीने दिले जात नाही. जुलै ते डिसेंबर या काळात ४९ खेळ पार पडतात. म्हणून डिसेंबरनंतर मानधन दिले जाते. यामध्ये पंच आणि मदतनीस म्हणून सहभागी होणाऱ्यांची संख्या ही ७०० ते ७५० एवढी असते. या सगळ्यांचे खाते मिळवून त्यांची पडताळणी करतो. यंदा फेब्रुवारी महिन्यातच सगळ्यांचे खाते क्रमांक मिळाले. त्यात अनेकांचे आयएफएससी कोड चुकलेले होते. त्यामुळे त्यांची फेर पडताळणी करावी लागली. ही फाईल आता अकाऊंट विभागाकडे गेली असून, येत्या सोमवारपर्यंत सर्वांना मानधन मिळेल, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्रीडा विभागातील समन्वयक अधिकारी प्रवीण कांबळे यांनी दिली.
अनेक क्रीडा स्पर्धा कल्याण-डोंबिवलीमध्ये पार पडल्या. मात्र, त्यामध्ये सहभागी झालेल्या पंच आणि मदतनीसांना मानधन मिळाले नाही. ही खूप खेदजनक बाब आहे. महापालिकेच्या आयुक्तांनीच आता या प्रकारात लक्ष घालून संबंधितांना न्याय मिळवून द्यायला हवा.
- अंकुर आहेर, समन्वयक, ठाणे जिल्हा एकविध क्रीडा महासंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.