लाईव्ह न्यूज

विद्यार्थ्यांसाठी ''आपले सरकार'' महागले

विद्यार्थ्यांसाठी ''आपले सरकार'' महागले
Published on: 

विद्यार्थ्यांसाठी ‘आपले सरकार’ महागले
शैक्षणिक सत्राच्या तोंडावर प्रमाणपत्रांच्या दरांमध्ये दुप्पट वाढ
शहापूर, ता. १७ (भरत उबाळे) ः यंदाचे शैक्षणिक सत्र काही दिवसांतच सुरू होणार आहे. त्याकरिता लागणारे दाखले आणि प्रमाणपत्रांसाठी पालक तसेच विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. दरम्यान, ऐन शैक्षणिक सत्राच्या तोंडावर आपले सरकार सेवा केंद्रांमधून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांच्या शुल्कात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच शुल्कवाढ केल्याने याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिक, विशेषतः विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे. २५ एप्रिलपासून हे नवीन दर लागू झाले असून, जात व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी ५७ ऐवजी १२८ रुपये, तर रहिवासी, उत्पन्न व इतर प्रमाणप‌त्रांसाठी ३३ ऐवजी ६९ रुपये आकारले जात आहेत.
दहावी आणि बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारी प्रमाणपत्रे घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालक आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये गर्दी करीत आहेत. दरम्यान, शुल्कवाढीमुळे त्यांच्यावर आर्थिक भार वाढला आहे. ही वाढ शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला झाल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांना प्रवास, प्रतिज्ञापत्रांची खर्चिक प्रक्रिया आणि आता वाढलेले शुल्क असा दुप्पट खर्च करावा लागत आहे.
२००८ मध्ये एक प्रमाणपत्र घेण्यासाठी फक्त २० रुपये शुल्क खर्च होता. संगणक व प्रिंटर देखभाल, वीज, भाडे यांसारख्या वाढत्या खर्चाचा हवाला देत २०१८ मध्ये दरवाढीचा निर्णय झाला. त्यानंतर आता साडेसहा वर्षांनी एकदम दुप्पट दरवाढ केली आहे. नागरिकांना घरबसल्याही प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज करता येऊ शकतो.
शहापूर हा आदिवासीबहुल तालुका असल्याने दऱ्याखोऱ्या आणि जंगल परिसरामुळे येथे मोबाईल नेटवर्कची दररोजच बोंब असते. अनेकांजवळ स्मार्टफोन नसल्यानेदेखील समस्या निर्माण होत असल्याने घरून अर्ज करण्याची प्रक्रिया क्लिष्ट बनत आहे. त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रातच येऊन अर्ज करावे लागत आहेत. त्यातच दरवाढ झाल्याने याचा भुर्दंड विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना सहन करावा लागत आहे.

प्रमाणपत्रांचे जुने व नवीन शुल्क

प्रमाणपत्र जुने शुल्क नवे शुल्क

जात प्रमाणपत्र ५७.२० १२८

नॉन क्रिमीलेअर ५७.२० १२८

रहिवासी प्रमाणपत्र ३३.६० ६९

राष्ट्रीयत्व ३३.६० ६९

एसईबीसी ३३.६० ६९

उत्पन्न प्रमाणपत्र ३३.६० ६९

शासनाकडून दर निश्चित करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासन करते. शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा कुणी अतिरिक्त शुल्क वसूल करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
- अमित सानप, प्रांताधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com