लग्न नियोजनबद्ध; पार्किंग मात्र बेशिस्त
वाशी, ता. १९ (बातमीदार) : सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अनेक सभागृहांच्या बाहेर दुचाकींसह चारचाकी, कार गाड्यांची भली मोठी रांग लागल्याचे दृश्य नजरेस पडत आहे. या सभागृहांमध्ये लग्न उत्तमरित्या, नियोजनबद्ध पार पडते; परंतु लग्न समारंभाच्या वेळी हॉलबाहेर पार्किंगची समस्या उद्भवत आहे. बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडते; तर पदपथावरदेखील पार्किंग करण्यात येत असल्यामुळे पादचाऱ्यांना चालणे जिकिरीचे होत आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येक नोडमध्ये सभागृह, बहुउद्देशीय इमारती आहेत; मात्र या सभागृहांच्या ठिकाणी पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला पदपथावर बेशिस्त पार्किंग करण्यात येत आहे. ऐरोली सेक्टर १७ मधील महाराष्ट्र सेवा संघ सभागृह, तेरापंथ हॉल, ऐरोली सेक्टर १५मधील प्रजापती हॉल, ऐरोली सेक्टर पाचमधील संत सावता माळी, कोपरखैरणेमधील शेतकरी समाज हॉल, ऐरोली सेक्टर १९ मधील बॅनकेट हॉल या ठिकाणी वाहनधारकांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यावरच वाहने पार्क करण्यात येतात. बेशिस्तपणे वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून, पदपथावरदेखील पार्किंग करण्यात येते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालावे कुठून, असा प्रश्न पडत आहे.
--------------------
वाजंत्री, फटाक्यांचाही त्रास
ऐरोलीतील सभागृहांचे बांधकाम करताना पार्किंग व्यवस्थेचा फारसा विचार केलेला नसल्याने विवाह सोहळ्यासाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त पद्धतीने उभी करतात. यामुळे सभागृहाबाहेर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच विवाह म्हटला की वाजंत्री, फटाक्यांची आतषबाजी यांची मोठी रेलचेल असते. फटके आणि वाजंत्र्यांमुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हृदयविकार असलेल्या, तसेच आजारी नागरिकांना, बालकांना याचा त्रास होतो.
------------------
हॉलमध्ये पार्किंगसाठी जागा आरक्षित नसल्यामुळे रस्त्यावर, तसेच पदपथावर बिनधास्तपणे नागरिक वाहने पार्क करतात. यामुळे पादचाऱ्यांनी चालायचे कुठून, असा प्रश्न पडत आहे. वाहतूक पोलिसदेखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. रस्त्यावर अस्ताव्यस्त पद्धतीने वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
- सचिन पाटील, नागरिक
------------------
ज्या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले आहेत, त्या ठिकाणची वाहने टोइंग करण्यात येऊन त्यांच्याकडून दंड आकारण्यात येतो. लग्न हॉलच्या बाहेर रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्क करण्यात येणाऱ्या वाहनांवरदेखील कारवाई करण्यात येते.
- संजय बेंडे, वाहतूक पोलिस निरीक्षक, रबाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.