थोडक्‍यात बातम्या पालघर

थोडक्‍यात बातम्या पालघर

Published on

अर्नाळा जेट्टीच्या रस्‍त्याला मेरीटाइम बोर्डाचा हिरवा कंदील
विरार, ता. १९ (बातमीदार) ः अर्नाळा जेट्टीकडून समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याच्‍या बांधकामासाठी मेरीटाइम बोर्डाकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. या रस्‍त्‍यासाठी अर्नाळा गावचे सरपंच नंदकुमार घरत यांनी मेरीटाइम बोर्डाकडे मागणी केली होती. त्याला अखेर यश आले आहे. वसई तालुक्यातील अर्नाळा येथे मोठ्या प्रमाणात मच्छीमार समुदायाची लोकवस्ती आहे. त्‍यांना नागरी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत अपुरी पडत आहे. अर्नाळा ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३५ हजारांच्या जवळपास असून, यामध्ये मच्छीमार समुदायची लोकवस्ती १० हजारांपेक्षा जास्त आहे. मच्छीमार समुदाय जेट्टीचा वापर बर्फ चढविणे, मासळी उतरविणे अशा कामांसाठी करीत असतो. मात्र या मार्गावर योग्य रस्‍ता नसल्याने मच्‍छीमार समुदायाची गैरसोय होत होती. त्यामुळे मेरीटाइम बोर्डाने आपल्या विभागामार्फत अर्नाळा जेट्टीकडून समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा उतरता रस्ता बनवून द्यावा, अशा मागणीचे पत्र सरपंचांनी मेरीटाइम बोर्डाला दिले होते. सरपंचांच्या मागणीनुसार मेरीटाइम बोर्डाने अर्नाळा जेट्टीकडून समुद्रकिनारी जाणाऱ्या उतरत्या रस्त्यास मंजुरी देत कामाची सुरुवात केली आहे.
...........
घनकचरा व्यवस्थापनाच्या नव्या निविदेला आगरी सेनेचा विरोध
स्‍थानिकांवर अन्याय होण्याची शक्‍यता; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा
विरार, ता. १९ (बातमीदार) ः वसई विरार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनामार्फत २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी त्रैवार्षिक निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेला आगरी कोळी सेनेकडून विरोध केला जात आहे. या निविदा प्रक्रियेमुळे स्‍थानिकांवर अन्याय होणार असल्याचे आगरी कोळी सेनेकडून सांगण्यात येत आहे. त्‍यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करवी अन्यथा आंदोलनाचा इशारा आगरी कोळी सेनेचे प्रमुख भूपेश कडुळकर यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
३ जुलै २००९ रोजी चार नगर परिषदा आणि ५३ गावांचा समावेश करून वसई विरार महापालिकेची स्थापना करण्यात आली. त्याआधी वसई तालुक्यात चार नगर परिषदांचा समावेश होता. या नगर परिषदांमधील कचरा व्यवस्थापन करणारे ठेकेदार व कर्मचारी हे वसई तालुक्यातील स्थानिक रहिवासी होते. यात प्रामुख्याने आदिवासी, आगरी, कोळी व पालघर जिल्ह्यातील मूळ रहिवाशांचा समावेश होता. महापालिका स्थापन झाल्यानंतर क्षेत्र वाढले तरी ठेकेदार व कर्मचारी हे स्थानिकच होते. क्षेत्र वाढल्यामुळे अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. महापालिकेच्या या १५ वर्षांच्या काळात झोन पाडून ठेके दिले जात होते. त्यामुळे साफसफाई व इतर कामे व्यवस्थित पार पडत होती तसेच झोनमुळे दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवणेही सुलभ होत होते. कर्मचारी स्थानिक असल्यामुळे आपत्तीच्या वेळी तसेच पूरपरिस्थिती, रेल्वे बंद, वीजपुरवठा खंडित होणे, कोरोना काळ, तसेच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्ती अशा विविध घटनांमध्ये ते तत्परतेने काम करतात, असे संघटनेेचे म्‍हणणे आहे. आता महापालिकेकडून त्रैवार्षिक निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याला आगरी कोळी सेेनेकडून विरोध करण्यात येत आहे. सध्याच्या झोनमध्ये वाढ करून प्रभागनिहाय ठेका रद्द करावा. स्थानिक ठेकेदार व स्थानिक सफाई कर्मचारी यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा अन्यथा आगरी कोळी सेनेच्या वतीने नवीन ठेकेदाराला काम करू दिले जाणार नाही. त्यामुळे पुढे निर्माण होणाऱ्या सर्व परिणामांसाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा आगरी कोळी सेनेचे पालघर जिल्‍हाध्यक्ष भूपेश कडुळकर यांनी पालिका आयुक्त अनिल पवार यांना पत्र देऊन केला आहे.
................
चंद्रकांत सावे यांचे निधन
बोर्डी (बातमीदार) ः सोमवंशी क्षत्रिय वाडवळ समाजातील सदस्य आचार्य भिसे शिक्षण संस्थेचे देणगीदार तसेच एम. एम. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक चंद्रकांत रघुनाथ सावे (वय ७७) राहणार देहेरी यांचे रविवारी (ता. १८) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मीना, मुलगा डॉ. आनंद, विवाहित मुलगी आरती असा परिवार आहे. चंद्रकांत सावे यांची सेवाभावी शिक्षक म्हणून ओळख होती. त्यांनी निवृत्ती घेईपर्यंत एम. एम. हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून पदभार सांभाळला. या काळात शिक्षकांसह विद्यार्थ्यांशी समन्वय साधून त्यांनी शैक्षणिक प्रगती साधली. पंचक्रोशीमध्ये चंद्रकांत सावे एक शिस्तबद्ध शिक्षक म्हणून ओळखले जात असत. आचार्य भिसे शिक्षण संस्थेला भरीव देणगी देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना संगीत व वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबविले होते. निवृत्तीनंतरही शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी ते विविध शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी देहेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक सदस्य उपस्थित होते.
.................
कामण-बापाणे रस्त्याच्या कामाला सुरुवात
विरार (बातमीदार) ः वसई तालुक्यातील कामण-बापाणे या रखडलेल्या रस्‍त्‍याचे काम सध्या जोरात सुरू आहे. या रस्त्यामुळे नायगाव स्‍थानकावरून कामणला जाण्याचे अंतर कमी होणार आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडून असलेला कामण-बापाणे रस्ता तयार करण्याची मागणी स्‍थानिकांनी केली होती. त्‍यामुळे रस्त्यातील कामण नदीवर पूल बांधण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी स्‍थानिकांकडून करण्यात आली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने ठेकेदाराला दिल्या आहेत. त्‍यानुसार रस्‍ता बांधकामानेदेखील जोर पकडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता तयार व्हावा, यासाठी स्‍थानिक नागरिक केदारनाथ म्हात्रे हे पाठपुरावा करीत होते. या रस्त्यामुळे वेळ, इंधनाची बचत होणार असून स्‍थानिक विकासाला गती मिळणार आहे.
........
विक्रमगड येथे बांबू लागवड मेळावा उत्साहात
विक्रमगड (बातमीदार) ः जिल्हाधिकारी कार्यालय पालघर व श्रमजीवी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रमगड येथे बांबू लागवड मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तहसील कार्यालय व पंचायत समिती विक्रमगड यांच्याकडून बांबू मेळाव्याचे आयोजन विक्रमगड येथील आमराई गार्डन येथे करण्यात आले होते. या मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी मूल्य आयोग समितीचे अध्यक्ष पाशा पटेल , वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित, विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, बांबू तज्ज्ञ‍ संजीव करपे, श्रमजीवी संघटनेचे राज्य अध्यक्ष रामभाऊ वारणा, उपजिल्हाधिकारी विजया जाधव, विक्रमगडच्या तहसीलदार चारुशीला पवार, पंचायत समिती विक्रमगड गट विकास अधिकारी मयूर मोगल, श्रमजीवी संघटनेचे जनरल सेक्रेटरी विजय जाधव, श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश रेंजड, बांबू लागवड समिती प्रमुख नीलेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार चारुशीला पवार यांनी केले. कृषी मूल्य आयोग समिती अध्यक्ष पाशा पटेल यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बांबू लागवडीसंदर्भात मार्गदर्शन केले. बांबूची लागवड कशा प्रकारे करायची, बांबूपासून कोणकोणत्या वस्तू बनवता येतात, बांबू शेतीपासून किती उत्पन्न मिळते, बांबू लागवडीकरिता कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतात, बांबू लागवड का करावी, याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. आमदार हरिश्चंद्र भोये व आमदार स्नेहा दुबे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पटारे यांनी केले. मेळाव्यास बहुसंख्य शेतकरीवर्ग उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com