येऊर वाचवण्यासाठी काँग्रेसही मैदानात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : संजय गांधी उद्यानाचा भाग असलेला व शांतता, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या येऊर वन परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आणि गैरव्यवहार वाढत चालला आहे. येथील जंगल आता गुन्हेगारीचा अड्डाही ठरू पाहात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यात काँग्रेसने ‘येऊर के सन्मान में’ असा नारा देत आज (ता. १९) आंदोलन केले. तसेच येऊर परिसराची पाहणी करत अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाईची मागणी केली.
येऊरमध्ये अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, टर्फ, बंगले, लग्नाचे लॉन असून, येथे मोठ्या प्रमाणात रात्रभर पार्ट्या, मोठ्या प्रमाणात दणदणाट असतो. रात्रभर चालणारे क्रिकेट टर्फ, तसेच दारूविक्रीसह मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश आवाजात धांगडधिंगा सुरू असतो. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या हवाई दल स्टेशन आणि उपग्रह दळणवळण केंद्र यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या मेहेरबानीने अनधिकृत हॉटेल व बंगले यांना २४ तास पाणीपुरवठा होत असताना येथील आदिवासी बांधवांना पाणीटंचाईचा सामना करत लागत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला.
काही दिवसांपूर्वी येऊर परिसरात पार्टीसाठी गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मद्य पाजून तिच्यावर दोन जणांनी अत्याचार केल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. या घटनेचा निषेध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी करत येऊरच्या पायथ्याशी आंदोलन केले होते. त्यानंतर आता ‘येऊर के सन्मान में, काँग्रेस मैदान में’ या शीर्षकाखाली ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दौरा करण्यात आला. अनधिकृत बांधकामे दाखवत कारवाई करून जमीनदोस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या वेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, उमेश कांबळे, महेंद्र म्हात्रे, रवींद्र कोळी, निशिकांत कोळी, संगीता कोटल, आशा सुतार, शिरीष घरत, आशीष गिरी, विनीत तिवारी आदी उपस्थित होते.
प्राण्यांचे वहिवाटीचे मार्ग बंद
बिबट्याच्या अधिवासाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या येऊरमध्ये रात्री ग्रामस्थांव्यतिरिक्त परवानगी नसतानाही सर्रास इतर वाहनांना येऊरमध्ये प्रवेश दिला जातो. वाहनांची रात्रभर ये-जा, तसेच अतिशय प्रखर रोषणाई व गोंगाटाच्या त्रासामुळे निशाचर प्राणी, पक्षी पूर्वीप्रमाणे येऊरमध्ये दिसत नाहीत, तसेच हाॅटेल, टर्फच्या आतील भाग दिसू नये, म्हणून उभारण्यात आलेल्या उंच संरक्षक भिंतीमुळे प्राण्यांचे वहिवाटीचे मार्ग बंद झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.