ठाणेकरांनी घेतले इमारतीच्या स्वयंपूर्ण विकासाचे धडे
ठाणेकरांनी घेतले इमारतीच्या स्वयंपूर्ण विकासाचे धडे
मध्यमवर्गीयांसाठी योजना कायद्याची; विश्वास सामाजिक संस्थेतर्फे चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : अनधिकृत धोकादायक इमारतींसाठी ठाण्यात क्लस्टर योजना राबवली जात असली तरी आता या योजनेला अनेक स्तरांवरून विरोध होऊ लागला आहे. विशेषतः अधिकृत इमारती पुनर्विकासाच्या प्रयत्नात असताना सदनिकाधारकांपेक्षा विकासालाच फायदा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून स्वयंपूर्ण विकास ही संकल्पना आता रुजू झाली असून, यासंबंधीचे धडे ठाणेकरांनी रविवारी घेतले. ‘विश्वास सामाजिक संस्थे’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात मध्यमवर्गीय ठाणेकरांसाठी ही योजना कशी फायद्याची आहे, हे अभ्यासकांनी मांडले आहे.
ठाणे शहरातील ३० ते ३५ वर्षांवरील जुन्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांच्या स्वयंपुनर्विकास या विषयावरील शंका आणि प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी विश्वास सामाजिक संस्थातर्फे नौपाड्यातील गोखले मंगल कार्यालयात विशेष परिसंवादाचे रविवारी (ता. १८) आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ओएसडी यतीन नाईक, उदय दळवी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार हर्षद मोरे, ज्येष्ठ वास्तुविशारद विनायक सहस्रबुद्धे, स्वयंपुनर्विकासाचे अभ्यासक विद्याधर वैशंपायन, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (टीडीसीसी) उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद एम. भोईर, अधिकारी शरद एन. काशिवले आदी सहभागी झाले होते. या परिसंवादाला नौपाडा परिसरातील जुन्या इमारतींमधील २०० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी केले.
---------------------------
स्वयंपुनर्विकासाची पुन्हा संकल्पना
१९८० पूर्वी नागरिक एकत्र येऊन भूखंड घेऊन घर बांधत होते. बदलत्या काळात बंद झालेली सहकारी तत्त्वावर गृहनिर्माण करण्याची परंपरा आमदार व मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी स्वयंपुनर्विकास संकल्पनेतून पुन्हा रोवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंपुनर्विकासाची कल्पना उचलून धरून २०१९ पासून आवश्यक शासन निर्णय जारी केले.
---------------------------------
मुंबईत सोसायट्यांचे पुनर्विकास प्रकल्प सुरू झाले असून, नौपाड्यासह ठाणे शहरातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी स्वयंपुनर्विकास योजनेची सविस्तर माहिती मिळावी, यासाठी चर्चासत्र भरविले आहे, असे विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी प्रास्ताविकात सांगितले.
---------------------------
मुंबई बॅंकेने कर्ज दिलेले १५ पैकी सात प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर ठाणे जिल्हा बॅंकेने सहा प्रकल्पांना १०.५० टक्के दराने कर्ज दिले असून, त्यामध्ये नौपाड्यातील बाळकृष्ण सोसायटी व आदर्श सहकारी सोसायटीचा समावेश असल्याची माहिती चर्चासत्रात देण्यात आली.
-----------------------
५०० चौरस फुटांचे घर मिळाले
गिरगावात २० लाखांना
स्वयंपुनर्विकास योजनेतील काही प्रकल्पांची यशोगाथा सादर केली गेली. त्यात गिरगावात ५०० चौरस फुटांचे घर अवघ्या २० लाख रुपयांना रहिवाशांना मिळाले. तर दादरच्या नंदादीप सोसायटीतील ३५० चौरस फुटांच्या घराऐवजी नागरिकांना तब्बल १,४०० चौरस फुटांचा स्वप्नातील निवारा मिळाला. या रहिवाशांनी एकदिलाने व संयमाने कार्य केल्यामुळे त्यांना मोठा फायदा झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.