व्यवसायिकांना भिती : शीघ्रगती समृद्धीमुळे मुंबई - नाशिक महामार्गावरील व्यवसायाला डाऊनफॉलचा फटका
शीघ्रगती समृद्धीमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील व्यवसायाला डाऊनफॉलचा फटका
वाहनांची संख्या कमी होणार, व्यावसायिक धास्तावले
भरत उबाळे
शहापूर, ता. १९ : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका ते ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील आमणे या ७६ किमी अंतराच्या अखेरच्या टप्प्यातील महामार्ग खुला होण्याची प्रतीक्षा आहे, परंतु शीघ्रगती समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील लांब पल्ल्याच्या प्रवाशांची वर्दळ आणि वाहनांची संख्याच यामुळे कमी होणार असल्याने या महामार्गावरील व्यवसायाला डाऊनफॉलचा सामना करावा लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सुरू असलेला व्यवसाय टिकवायचा कसा, या प्रश्नाच्या काळजीने व्यावसायिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
समृद्धी महामार्गाच्या शीघ्रगतीमुळे प्रवासाच्या वेळेची मर्यादा आपसूकच कमी झाली आहे. तसेच अंतरदेखील घटले आहे. म्हणून जवळच्या अंतरावरून प्रवास करणारे प्रवासी तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघालेले प्रवासी विशेषकरून समृद्धी महामार्गालाच पसंती देण्याची दाट शक्यता दिसत आहे. त्यामुळे पर्यायाने मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनांची वर्दळ कमी होणार असल्याने या महामार्गावरील डिझेल व पेट्रोलपंप चालक, हॉटेल व्यावसायिक, ढाबाचालक, गॅरेज व्यावसायिक यांच्याप्रमाणेच लहान-मोठ्या इतर व्यावसायिकांच्या व्यवसायावर डाऊनफॉल येण्याची दाट चिन्हे आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावर ठाणे ते थेट इगतपुरीपर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून हॉटेल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. महामार्गाच्या दुतर्फा उंची हॉटेल्स असल्याने नाश्ता, चहापान आणि जेवणासाठी महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी येथे गर्दी करतात. मुंबई-नाशिक महामार्गामुळेच गेली अनेक वर्षे येथील हॉटेल आणि ढाबा इंडस्ट्री जोमाने सुरू होती, परंतु या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या रोडावणार असल्याने त्याचा थेट परिणाम मुंबई-नाशिक महामार्गावरील व्यवसायावर होणार आहे. परिणामी शीघ्रगती समृद्धीमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील व्यावसायिक धास्तावले आहेत. याबाबत हॉटेलमालक इरफान शेख यांनी सांगितले की, आम्ही आतासुद्धा मंदीच्या सावटाखालीच व्यवसाय चालवत आहोत. वाहने समृद्धी महामार्गावरून गेल्याने आम्हाला मोठा फटका बसणार आहे. गॅरेजमालक निवृत्ती भोर यांनी समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर आमच्या व्यवसायावर गंडांतर येणार आहे. आम्ही आत्तापासूनच धास्तावलो आहोत.
अखेरच्या टप्प्यातील महामार्ग खुला होण्याची प्रतीक्षा
समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक आव्हानात्मक असलेला इगतपुरी ते आमणे हा ७६ किमीचा शेवटचा टप्पा महाराष्ट्रदिनी १ मे रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता. तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने साफसफाई, डागडुजी आणि रंगरंगोटीची कामे पूर्ण केली आहेत. उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणाऱ्या संपूर्ण ७०१ किमी अंतराच्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले होते. त्यानंतर शिर्डी ते नाशिकमधील भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आता शेवटच्या आणि अत्यंत अवघड व आव्हानात्मक तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आता रस्त्याचे काम पूर्ण होऊनही शिल्लक उरले आहे.
फोटो : शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील दुतर्फा ढाबे आणि हॉटेल आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.