उल्हासनगरावर राहणार करडी नजर
दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २० : शहरात गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. त्यामुळे उल्हासनगरवर नजर ठेवण्यासाठी ९८५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम जलदगतीने सुरू झाले आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
राज्य सरकारच्या गृहविभागाने ५ जानेवारी २०२४ मध्ये जारी केलेल्या जीआरमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशान्वये उल्हासनगरमध्ये ९८५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहे. सीसीटीव्हीसाठी भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी आणि खांब बसवण्यासाठी खोदकाम करणे आवश्यक होते. मागच्या वर्षी तशी खोदकामाची परवानगी महापालिकेचे तत्कालीन प्रभारी आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली होती. त्यानुसार ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशान्वये बिनतारी संदेश विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप कन्नलू यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद बिरारे यांच्या देखरेखीत खोदकामाची प्रक्रिया हाताळण्यात आली आहे. यासाठी ३९८ खांब बसवण्याचे आणि त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे कॅमेरे उल्हासनगर पोलिस ठाणे, मध्यवर्ती पोलिस ठाणे, विठ्ठलवाडी पोलिस ठाणे आणि हिललाइन पोलिस ठाणे या चार पोलिस ठाण्याच्या हद्दीत लागणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे हे संवेदनशील भाग, गुन्हेगारी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि विविध वादग्रस्त घडामोडींवर २४ तास नजर राहणार आहेत.
दोन कंट्रोल रूम
कॅमेऱ्यांचे दोन कंट्रोल रूम सज्ज करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक पोलिस नियंत्रण कक्ष आणि दुसरे उल्हासनगर महापालिकेतील मुख्यालयात असणार आहे. कंट्रोल रूममध्ये २४ तास पोलिस कार्यरत असणार आहे. कोणतीही वादग्रस्त घटना सीसीटीव्हीमध्ये टिपली गेल्यास तत्काळ पोलिस यंत्रणा सतर्क राहणार असल्याचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.