क्षयरोगावर ‘बिपाल’चा उतारा
क्षयरोगावर ‘बिपाल’चा उतारा
आतापर्यंत १५० रुग्णांना डोस; सर्व केंद्रांना निर्देश
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : एमडीआर टीबी रुग्णांच्या उपचारात महत्त्वाचे ठरणाऱ्या बिपाल औषधाचा डोस देण्यास मुंबईत सुरुवात झाली आहे. जे. जे. रुग्णालयाव्यतिरिक्त मुंबई महापालिकेच्या सर्व डीआरटीबी केंद्रांमध्ये बिपाल डोस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एमडीआर टीबी असणाऱ्या आणि बिपाल डोससाठी पात्र असणाऱ्या रुग्णांनाच त्यांच्या इच्छेनुसार बिपाल डोस दिला जात असल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी ‘सकाळ’ला दिली.
डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, मुंबईतील सर्व डीआरटीबी केंद्रांना बिपाल डोस देण्याच्या सूचना दिल्या आहेत. पात्र रुग्णांच्या इच्छेनुसारच डोस दिला जातो. गेल्या आठवड्यापर्यंत मुंबईतील पालिका डीआरटीबी केंद्रांमध्ये १५० पात्र एमडीआर टीबी रुग्णांना बिपाल डोस देण्यात आला आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रात ३१ डीआरटीबी केंद्र आहेत. त्यापैकी सहा खासगी आहेत. २९ महापालिकेची केंद्रे आहेत. पालिकेला बिपालचे ३०० हून अधिक डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी १५० रुग्णांना बिपाल डोस देण्यात आले आहेत, तर पुढच्या एका महिन्यात इतर १५० रुग्णांनाही डोस दिले जाणार असल्याचे डॉ. शाह यांनी सांगितले. एमडीआर टीबी रुग्णांना म्हणजेच मल्टि ड्रग रेझिस्टन्स असणाऱ्या रुग्णांना बिपाल दिल्याने सहा महिने औषध घेऊन टीबी रुग्ण पूर्णतः बरा होऊ शकणार आहे.
बिपाल कशामुळे फायदेशीर?
केंद्र सरकारने २०२५ पर्यंत संपूर्ण देशातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बिपालची मदत होणार आहे. टीबीतज्ज्ञांच्या मते, क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण एमडीआरचे असतात. यात या मल्टी ड्रग्स रेझिस्टन्समध्ये रुग्णांवर टीबीच्या काही औषधांचा परिणाम होत नाही. या रुग्णांना किमान २० ते २४ महिने औषधे घ्यावी लागतात, तर सहा महिने इंजेक्शन्स घ्यावी लागतात. हा दीर्घ डोस कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने बिपालला मान्यता दिली होती. त्याची सुरुवात जे. जे. रुग्णालयापासून करण्यात आली आहे.
आता दहाऐवजी चारच औषधे घ्यावी लागणार
बिपाल ही एक बहुप्रतीक्षित उपचार प्रणाली आहे, जी अनेक देशांमध्ये सुरू आहे. तीन वर्षे चाललेल्या या चाचणीत रुग्णांवर ९० टक्के सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यानंतर भारतातही ते सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. याआधी एमडीआर रुग्णांना दररोज दहापेक्षा जास्त औषधे घ्यावी लागत होती, मात्र आता त्यांना फक्त तीन औषधांचा कॉम्बो पॅक बिपाल घ्यावा लागतो. यामध्ये बेडाक्विलिन(बी), प्रीटोमॅनिड(पा), लाइनझोलिड(एल) आणि मोक्सीफ्लॉक्सासिन (एम) सह किंवा त्याशिवाय या गोळ्यांची रेजिमन दिली जाते.
बिपाल डोसची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे. चाचणीच्या अहवालानुसारच बिपाल डोस आता पूर्ण सक्षमतेने टीबी रुग्णांना दिला जात आहे. रुग्णांच्या सोयीनुसार आणि वैद्यकीय निकषांनुसार डीआरटीबी केंद्रातील डॉक्टर हा डोस देतात. त्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, डॉक्टर यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. यात डीआरटीबी केंद्राचा स्टाफ, १०० डॉक्टर्स आणि १५० टीबी कर्मचारी, दवाखान्यातील डॉक्टर अशा एकूण ४०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
- डॉ. दक्षा शाह,
कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.