पोलिस उपनिरीक्षक कुटे दुसऱ्यांदा निलंबित
नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नवी मुंबईचे सह पोलिस आयुक्त संजय येनपुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिस उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कृष्णा कुटे यांनी यापूर्वी एका किरकोळ अपघातातील कारचालकाला कायद्याचा धाक दाखवून, त्याला बेदम मारहाण करून त्याच्या वडिलांकडून ७० हजार रुपये उकळले होते. त्यामुळेसुद्धा कुटे यांच्यावर नोव्हेंबर २०२३मध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
पोलिस उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांनी २०२०मध्ये तळोजा पोलिस ठाण्यात कार्यरत असताना मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिसासोबत मैत्री करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. कृष्णा कुटे यांनी पीडित महिला पोलिसाचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मागील पाच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचे तसेच या पीडित महिलेचा जातीवाचक अपशब्द वापरून अपमान केल्याचा आरोप पीडित व महिलेने केला आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराची सहपोलिस आयुक्त संजय येनपुरे यांनी गंभीर दखल घेऊन पोलिस उपनिरीक्षक कुटे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. लोकहिताच्या दृष्टीने कुटे यांना १६ मे २०२५ पासून पुढील आदेशापर्यंत सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे सहपोलिस आयुक्तांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
-------------------
गणवेश, सरकारी शस्त्र जमा करण्याचे आदेश
निलंबन कालावधीत कुटे यांना पोलिस आयुक्त कार्यालयात दररोज एकदा बायोमेट्रिक हजेरी देण्यास बजावण्यात आले आहे. खासगी कामासाठी मुख्यालय सोडून बाहेर जाताना कार्यालयाची आगाऊ लेखी परवानगी घेण्याचे तसेच त्यांना गणवेश, ओळखपत्र, सरकारी शस्त्र व दारूगोळा पोलिस मुख्यालयात जमा करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.
----------------------
यापूर्वीही निलंबनाची कारवाई
कृष्णा कुटे यांनी ३० ऑक्टोबर २०२३ मध्ये मानखुर्द येथे घडलेल्या एका किरकोळ अपघातातील कारचालकाला हिट अँड रनची केस दाखल करून त्याला तीन वर्षांसाठी जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली होती. तसेच त्याला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे मारहाण केली होती. या वेळी नुकसानभरपाई म्हणून गाडी मालकाला ३० हजार रुपये व स्वत:साठी ४० हजार रुपये असे एकूण ७० हजार रुपये कारचालकाच्या वडिलांकडून उकळले होते. त्या वेळी परिमंडळ १चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिस उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांना निलंबित केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.