अतिक्रमणामुळे भिवंडीतील फूटपाथ गायब
अतिक्रमणामुळे भिवंडीतील फूटपाथ गायब
भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : मागील दोन दिवसांपासून सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पूर्णपणे गटार-नाले सफाई झालेली नाही. त्यामुळे मुसळधार पाऊस झाला तर शहरात अनेक ठिकाणी पाणी साचते. रस्त्यावरील पाणी गटारात जाण्याचा मार्ग नाही. त्यामुळे अशा पाण्यातून वाट काढीत नागरिकांना चालावे लागत आहे. एकीकडे दुकानदार, फेरीवाले, हॉटेलवाले आणि बेकायदा वाहने पार्क करणाऱ्या दुकानदार आणि नागरिकांमुळे शहरातील मुख्य रस्त्यालगतचे पदपथ गायब झाले आहेत. सध्या जे पदपथ शिल्लक आहेत, त्याची दुरवस्था झाल्याने त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे, तर बहुतेक पदपथांवरील चेंबर्सचे झाकण गायब झाले आहेत.
शहरात येण्यासाठी कल्याणरो साईबाबा बायपास, अंजूरफाटा, नदीनाका, चावींद्रा हे मुख्य रहदारीचे मार्ग आहेत. या मार्गावरून शहरात येणाऱ्या सर्व रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे पदपथ जवळजवळ गायब झाले आहेत. मुख्य रस्त्यावर सीसी रस्ता बांधल्यानंतर काही ठिकाणी त्याच्या शेजारी पेव्हर ब्लॉक लावून अर्धा रस्ता तयार केला आहे, पण दुकानदारांनी फूटपाथच्या पलीकडे अगदी पेव्हर ब्लॉकपर्यंत अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेने धोकादायक स्थितीत चालावे लागत आहे.
शहरातील रस्त्यांवरील पदपथांवर दुकानदारांनी स्वतःच फेरीवाल्यांना बसवून अतिक्रमण केले आहे. दुकानासमोर हातगाडी लावण्याचे हातगाडी व फेरीवाल्याकडून दररोज २०० ते ३०० रुपये भाडे घेतले जाते, तर शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी स्वतःच फेरीवाले आणि हातगाडी विक्रेत्यांना पदपथांवर उभे करतात आणि त्यांच्याकडून भाडे घेतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतरदेखील त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केले जाते, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.
रस्त्यांच्या कडेला अनेक ठिकाणी गटार बांधले जात नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबण्याचे प्रकार वाढणार आहेत. वास्तविक रस्ता बांधण्यापूर्वी गटार बांधले पाहिजे. याबाबत महापालिकेचे शहर अभियंता जमील पटेल यांना विचारले असता त्यांनी दरम्यानच्या काळात प्रशिक्षणासाठी बाहेर गेल्याचे सांगत काहीही बोलण्यास नकार दिला.
अरुंद रस्त्यांमुळे रहदारीस अडथळा
शहराच्या मध्यवर्ती भागात शिवाजीनगर, ठाणगेआळी, पद्मानगर भाजीमंडई आणि तीनबत्तीसह बाजारपेठ भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथांवर दुकाने आहेत. कपड्यांच्या दुकानासह ज्वेलरी बाजार असून, त्यांनी शोरूमला साजेसे बनविण्यासाठी गटारे व फूटपाथवर अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे बाजारपेठेतील रस्ते अरुंद झाले आहेत. या दुकानांनंतर रस्त्यावर उरलेली जागा दुचाकी पार्किंग इत्यादींसाठी वापरली जाते. ठाणगे आळीत सोन्याच्या शोरूम मालकाने रस्त्यावर अतिक्रमण करून दुकानाचे सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा झाला आहे, मात्र पालिका अधिकारी कारवाई करीत नाही. त्यामुळे शहर विकास विभागाने रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
आम्ही रस्त्यावर चालण्याच्या अधिकारासाठी लढत आहोत. मी स्वतः अनेक वेळा महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत जाऊन अतिक्रमण हटवले आहे. यासाठी मी अनेक वेळा महापालिका आयुक्तांसोबत बैठका घेतल्या आहेत. त्यांना चालण्यासाठी योग्य रस्ता बांधण्याची विनंती केली आहे. माझ्या परिसरात बांधल्या जाणाऱ्या सर्व नवीन रस्त्यांवर मी सीसी फूटपाथ बांधले आहेत, परंतु पदपथांवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना, विशेषतः दिव्यांगांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रस्त्यावर अतिक्रमण न करणे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे.
- रईस शेख आमदार, भिवंडी पूर्व
भिवंडी महापालिका क्षेत्रात नियोजनशून्य पद्धतीने विकासकामे सुरू आहेत. काँक्रीटचे रस्ते बांधले जात आहेत, परंतु पादचाऱ्यांसाठी पदपथ आणि गटारांचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना अडचणी येत आहेत. महापालिकेने सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्यात आणि करांचा योग्य वापर विकासासाठी करावा. महापालिका आयुक्तांनी बांधकाम कामाची स्वतः पाहणी करावी आणि अनियमितता दूर करावी. अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर निलंबनासारखी कठोर कारवाई करावी आणि अकार्यक्षम कंत्राटदारांची नावे काळ्या यादीत टाकावीत.
- अशोक जैन, निमंत्रक ऑल जैन फेडरेशन भिवंडी
पदपथांवरील अतिक्रमणांबाबत महापालिका प्रशासन दर महिन्याला एक किंवा दोनदा कारवाई करते. महापालिकेत मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आम्हाला फारशी कारवाई करता येत नाही, परंतु शहरातील नागरिकांनाही अतिक्रमणाबाबत जागरूक राहण्याची गरज आहे.
- अरविंद घुगरे, अतिक्रमण विभागप्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.