रायगड
भूमी अभिलेखकडून हद्द निश्चित करण्यास टाळाटाळ; शेतकऱ्याची आयुक्तांकडे तक्रार
पेण (वार्ताहर) : तालुक्यातील मौजे दिव गावाच्या हद्दीतील गट नंबर १२५ जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी पेण भूमी अभिलेख कार्यालयाकडून टाळाटाळ होत आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा तक्रार अर्ज शेतकरी रत्नाकर रघुनाथ म्हात्रे यांनी जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्याकडे केला आहे.
संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रार अर्जानुसार आम्ही पाहणी केली असता, जुन्या आणि नवीन नकाशामध्ये फरक आढळून येत आहे. यामुळे शेतकऱ्याने वरिष्ठ पातळीवर अपील करून यातील दुरुस्ती करून घ्यावी, असे भूमी अभिलेखाचे उपाधीक्षक अनिल बाविस्कर यांनी सांगितले.
.................
किरकोळ कारणावरून मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
रोहा (बातमीदार)ः गटारातील घाण पाणी सोडत असताना जमीनमालकाने त्यास विरोध केला. याचाच राग मनात धरून जमीनमालकाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमक दिली आहे. याप्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात यशवंतखार या गावातील जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेश जवके (रा. वावे पोटगे, ता. रोहा) असे आरोपीचे नाव आहे. बुधवारी (ता. २१) फिर्यादी अशोक ठाकूर हे चुलत भावाकडे जात होते. या वेळी त्यांच्या मालकीच्या जागेत शेजारी राहणारे रघुनाथ गायकर यांच्या घराजवळील गटाराचे घाण पाणी त्यांचा जावई शैलेश जवके हा ठाकूर यांच्या जागेत सोडत होता. अशोक ठाकूर यांनी त्यास विरोध केला असता, शैलेशने त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याविषयी अशोक ठाकूर यांनी रोहा पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एस. एन. बैसाणे पुढील तपास करीत आहेत.
--------------------
पेणमध्ये वारंवार वीज खंडित
शिवसेना ठाकरे गट आक्रमक
५ जूननंतर शिवसेना आंदोलन करणार - प्रसाद भोईर
पेण (वार्ताहर) : तालुक्यात सध्या मुसळधार पावसामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याचा फटका लघू उद्योगांसह कारखानदारांना तसेच सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २३) महावितरण कार्यालयावर धडक देत आक्रमक भूमिका घेतली.
या वेळी विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी महावितरणाचे अधीक्षक अभियंतांना सांगितले, की विजेच्या लपंडावामुळे ग्राहक मेटाकुटीला आला आहे. त्यातच कोकण आपत्ती समीकरणाअंतर्गत या विभागातील सर्व वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम अपूर्ण आहे. यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती आहे. तसेच जीर्ण झालेले विजेचे पोल, फॅब्रिकेशनची नादुरुस्त, खराब झालेल्या तारा, तक्रार निवारणासाठी कायमस्वरूपी कर्मचारी, नवीन वीजजोड कमीत कमी खर्चात, जळालेले किंवा बंद पडलेले मीटर मोफत बदलून द्यावेत यासह अनेक मागण्यांचे निवेदन त्यांनी दिले. वीज ग्राहकांच्या समस्या तात्काळ सोडवा अन्यथा ५ जूननंतर शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही भोईरांनी दिला आहे.
या वेळी विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, समन्वयक नरेश गावंड, तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, महिला संघटिका दर्शना जवके, महानंदा तांडेल, मेघना चव्हाण, सुधीर ढाणे, भगवान पाटील, विभागप्रमुख दीपक पाटील, नंदू मोकल, हिराजी चौगुले, जयराज तांडेल, चेतन मोकल, युवासेना अधिकारी नीलेश म्हात्रे, विनोद म्हात्रे, शिवाजी म्हात्रे, गंगाधर पाटील रवींद्र मोकल आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------
अलिबाग बस स्थानकाचे सर्वेक्षण
अलिबाग (वार्ताहर) : प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या, स्थानक स्वच्छ राहावे यासाठी एसटी महामंडळाच्या सर्व एसटी बस स्थानकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. संभाजीनगरच्या प्रादेशिक व्यवस्थापक विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी अनिता कोकाटे, अलिबाग एसटी बस आगाराचे व्यवस्थापक चेतन देवधर, एसटीप्रेमी यांच्या देखरेखीखाली अलिबाग एसटी बस आगारासह स्थानकाची पाहणी केली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छ सुंदर बस स्थानक’ या अभियानाद्वारे हा उपक्रम सुरू केला आहे. प्रवाशांना एसटी महामंडळाकडून चांगल्या सेवा देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. स्वच्छ ठेवणाऱ्या महामंडळाकडून स्थानकांना बक्षीस दिले जाणार आहे. स्थानकातील स्वच्छता, गाड्यांची अवस्था, कार्यालयीन कामकाज, कर्मचाऱ्यांचे राहणीमान आणि कार्यालयीन व्यवस्थापन अशा सर्वच बाबींची माहिती प्रत्यक्ष भेटून घेतली. काही प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांच्याकडून अभिप्राय घेतला.
------------------
श्रीवर्धन तालुक्यातील ९८१ मच्छीमारी बोटी बंदरावर
समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने साडेसहा हजार मच्छीमार व्यावसायिक चिंतेत
श्रीवर्धन (वार्ताहर)ः पावसाळ्यात मासेमारी बंदीच्या अगोदरच समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे. शनिवार (ता. ३१)पासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी सुरू होणार होता. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यातील ९८१ बोटी बंदरावर नांगरून ठेवल्या आहेत. याचा फटका मच्छीमार व्यावसायिकांना बसला असून, या वेळी बांगडा, करली आणि काही प्रमाणात कोळंबीची आवक वाढली होती. परंतु बंदीमुळे मासळी मिळणे कठीण झाल्याने खवय्ये नाराज झाले आहेत.
श्रीवर्धन येथे जीवना बंदर, मूळगाव कोळीवाडा तर तालुक्यात दिघी, कुडगाव, आदगाव, दिवेआगर, भरडखोल, बागमांडला या परिसरात मच्छीमार व्यावसायिक आहेत. तालुक्यात एकूण साडेसहा हजार मच्छीमार व्यावसायिक असून, खराब वातावरणामुळे मच्छीमार व्यावसायिक चिंतेत पडला आहे. यानंतर आता शासनाने आमचा विचार करून सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा, असे मच्छीमार व्यावसायिकांनी मत मांडले.
-------------------
जिल्हा प्रशासन नवउद्योजकांच्या खंबीरपणे पाठीशी ः जिल्हाधिकारी
अलिबाग (वार्ताहर)ः मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुशिक्षित युवक-युवतींना व्यवसाय उभारणीसाठी प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. शासनाने या योजनेत आमूलाग्र बदल केला असून, कोकणातील स्थानिक बाबींचा यामध्ये समावेश केला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा लाभ घेऊन उद्योजक बनावे. यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व बँक यांनी सर्वतोपरी सहाय्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी (ता.२३) करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गुरुशांत हरळय्या, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय कुलकर्णी, उद्योजक लक्ष्मण जाधव यांसह जिल्ह्यातील प्रमुख बँकर्स उपस्थित होते.
---------------
शेकाप पदाधिकाऱ्यांची बांधकाम कार्यालयावर धडक
निकृष्ट रस्त्यांच्या कामाबाबत विचारला जाब
अलिबाग (वार्ताहर)ः शेकापच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २३) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. या वेळी तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांच्या स्थितीबाबत आणि निकृष्ट दर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावर मुख्य अभियंत्यांनी या सर्व तक्रारींची दखल घेत दोषी ठेकेदारांवर चौकशीसह कारवाई करण्याचे आश्वासन शेकापच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतमधील महान फाटा ते महानवाडी रस्ता, तळवली ते भोनंग रस्ता तसेच मापगाव विभागातील रस्ते सध्या अतिशय नादुरुस्त झाले असून, नागरिकांचे हाल सुरू आहेत. अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच ५० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या मोऱ्या अवघ्या १५ दिवसांत खचल्या असून, त्यांच्यावर खड्डे पडले आहेत. या पार्श्र्वभूमीवर शेकापचे नवनिर्वाचित तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे, युवक सदस्य अभिजित वालंज, नीलेश खोत, विभागीय चिटणीस संदीप गायकवाड, ॲड. शोधन ठाकरे, अक्षय डिकले, यश पाटील, नितीन जानकर, बाळू नवखारकर, नवनीत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकाऱ्यांची भेट घेतली.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.