कल्याण-डोंबिवलीत ४८ धोकादायक इमारतीची वाढ
कल्याण - डोंबिवलीत ४८ धोकादायक इमारतींची वाढ
पालिका क्षेत्रात ५१३ धोकादायक; अतिधोकादायक इमारतींमध्ये हजारो रहिवाशांचा जीव मुठीत घेऊन वास्तव्य
कल्याण, २२ (वार्ताहर) : कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी चारमजली इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून मंगळवारी (ता. २०) झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा निष्पाप रहिवाशांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेने पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या अनेक घटना घडत असल्याने कोणतीही जीवितहानी घडू नये म्हणून प्रशासन पालिका क्षेत्रातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी घोषित करीत असते. पालिकेने नुकतीच धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून, यामध्ये धोकादायक ३३७ आणि अतिधोकादायक १७६ अशा एकूण ५१३ इमारती मरणासन्न अवस्थेत आहेत. या इमारतीत हजारो कुटुंबे जीव मुठीत घेऊन आजही वास्तव्य करीत आहेत. त्यांच्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोणतेच धोरण राबविले जात नसल्याने मरणासन्न इमारतींत वास्तव्य करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय उरलेला नाही.
रहिवाशांच्या पुनर्वसनाचा तिढा गुंतागुंतीचा
धोकादायक इमारतीचे मालक व रहिवाशांतर्गत वादामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. धोकादायक इमारतीतील रहिवासी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करात आहेत. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून अनेक रहिवाशांना मृत्यूला सामोरे जावे लागते. याशिवाय धोकादायक इमारतीतील नागरिकांच्या सुरक्षेचा व वास्तव्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. डोंबिवली व कल्याण येथे हातावर मोजता येतील एवढेच दोन-तीन संक्रमण शिबिरे असल्याने इमारती कोसळून बेघर होणाऱ्या रहिवाशांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करताना मनपाची चांगलीच तारांबळ उडते. पावसाळा तोंडावर आला की पालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून पालिका क्षेत्रातील इमारतींचा अहवाल मागितला जातो आणि या धोकादायक इमारतींना नोटिसा दिल्या जातात.
यंदा धोकादायक इमारतींची संख्या वाढली
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी २०२४-२५ सालात पालिका क्षेत्रात ३०४ धोकादायक तर १६१ अतिधोकादायक अशा एकूण ४६५ इमारतींमध्ये पाच हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्यास असल्याचे नमूद केले होते. पालिका प्रशासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी पालिका क्षेत्रातील १० प्रभागांतील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. यामध्ये धोकादायक ३३७ तर १७६ अतिधोकादायक अशा एकूण ५१३ इमारतींची यादी जाहीर केली आहे. यंदा गतवर्षीपेक्षा ३३ धोकादायक आणि १५ अतिधोकादायक अशा ४८ इमारतींची वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सप्तशृंगी इमारत दुर्घटना प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ३० वर्षांहून अधिक काळ झालेल्या रहिवासी इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आवाहन केले असल्याने धोकादायक इमारतींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.