

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज
४० खाटांच्या कक्षाची निर्मिती
ठाणे शहर, ता. २४ (बातमीदार) : काही देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. मुंबईपाठोपाठ ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने ठाणे जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात ४० खाटांचा विशेष कक्ष तयार केला आहे. खबरदारी म्हणून तातडीने तयार केलेल्या कोरोना कक्षात रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा ठेवल्या असतानाच डॉक्टरांचे पथक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनादेखील आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
ठाण्यात तीन कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि आरोग्य केंद्राच्या पातळीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेने झाडाझडती घेण्याचे काम सुरू केले आहे. सर्व ठिकाणच्या औषधे आणि आवश्यक साहित्यांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात सद्यःस्थितीत ४० खाटांचा विशेष कक्ष तयार केला असून, आवश्यकता भासल्यास त्यात आणखी शंभर खाटांची वाढ होईल, अशी तयारी केल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली. शुक्रवारी (ता. २३) ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी विशेष वॉर्डची पाहणी केली. या पाहणीत व्हेंटिलेटर, ऑक्सिजन साठा, सॅनिटायझर, मास्क आणि इतर साधनांचा आढावा घेतला. डॉक्टर, सहाय्यक आरोग्य कर्मचारी, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित केल्याची माहितीही दिली.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य यंत्रणांनी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्कचा वापर करण्याचे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे, हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांची सतर्कता आणि सहकार्य हेच या संसर्गाला दूर ठेचण्याचे परिणामकरक माध्यम आहे. शहरातील शाळा, महाविद्यालये, कार्यालये, मॉल्स आणि बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मास्क व सॅनिटायझर वापरासंबंधीच्या मार्गदर्शिकेचे पालन करावे.
डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.