

खारघर, ता. २४ (बातमीदार) : तळोजा एमआयडीसी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वायू व जलप्रदूषण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरातील रासायनिक आणि मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून त्यांच्यासाठी नवीन झोन तयार करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
तळोजा एमआयडीसीमध्ये अभियांत्रिकी कंपन्यांसोबतच अनेक रासायनिक तसेच काही मत्स्यउद्योग प्रक्रिया कंपन्या आहेत. या कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर वायू तसेच जलप्रदूषण होत असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तळोजा एमआयडीसीच्या चोहोबाजूंनी नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर वाढत असून, त्यांना या प्रदूषणाचा त्रास होत आहे. याबाबत सातत्याने पत्रव्यवहार, बैठकांद्वारे हा विषय राज्य सरकारकडे मांडत आलो आहे. या रासायनिक कंपन्यांमधून विशेषतः रात्रीच्या वेळी घातक वायू हवेत सोडले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होत असून, नागरिकांना श्वसनाच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. रासायनिक कंपन्यांकडून रसायनमिश्रित दूषित पाणी तसेच सांडपाणी हे या परिसरातील नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे नद्यांमधील जैवविविधता धोक्यात आली आहे, असेही आमदार ठाकूर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
--------------------------
कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक
मत्स्यप्रक्रिया उद्योगांमुळे आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधी तसेच वायू प्रदूषणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे पनवेल व आजूबाजूच्या परिसरात सध्या खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे चालू आहेत, तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोठमोठ्या गृहसंकुलांची कामे चालू आहेत. या सर्वांमुळे या परिसरातील लोकसंख्या खूप वाढणार आहे. त्यादृष्टीने या जल, वायू प्रदूषणाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे आमदार ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.