

पनवेल, ता. २४ (बातमीदार) : आपत्ती व्यवस्थापनासाठी पनवेल महापालिकेने प्रभावीपणे उपाययोजना राबवल्या आहेत. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचू नये म्हणून १०० आणि ५० एचपी क्षमतेचे पंप लावण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून जनजीवन विस्कळित होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी महापालिकेने घेतले आहेत. त्याचबरोबर एकाही घरात पाणी शिरणार नाही, याचीसुद्धा दखल देण्यात आलेली आहे. त्यानुसार ठोस पावले उचलण्यात आले असल्याचे पनवेल महापालिकेकडून सांगण्यात आले.
पनवेल महापालिकेची हद्द ११० किलोमीटर परिसरात आहे. सिडको वसाहती आणि २१ गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कळंबोली वसाहत समुद्रसपाटीपासून खाली आहे. त्यामुळे कमी पावसातही हा परिसर जलमय होतो. या कारणाने जनजीवन पूर्णपणे विस्कळित होते. त्याचबरोबर बैठ्या घरांमध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. २६ जुलै २००५ला मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी या ठिकाणी झाली होती. त्यानंतर सिडकोने पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चॅनेल निर्माण केले आणि पावसाळी गटारांची साफसफाई सुरू केली. तरीसुद्धा सिडको वसाहतीत विशेषकरून कळंबोली आणि नवीन पनवेलमध्ये अनेक ठिकाणी दरवर्षी पाणी शिरते. आता सिडकोने या वसाहती महापालिकेकडे वर्ग केलेल्या आहेत. या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत महापालिकेने ज्या ठिकाणी पाणी साचते तेथे जास्त क्षमतेच्या पंपाची व्यवस्था केली आहे. कळंबोलीत १०० आणि ५० एचपीच्या पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यंत जलद गतीने साचलेले पाणी जलधारण तलावामध्ये सोडता येणे आताच शक्य होणार आहे. त्यामुळे वसाहतीत यावर्षी जास्त पाऊस झाला तरी पाणी साचून जनजीवन विस्कळित होणार नाही, याबाबतची दक्षता महापालिकेने घेतली आहे.
----------------
महापालिकेकडे असणाऱ्या
एचपी संख्या
१०० २
५० ३
२५ २
-----------------
कळंबोलीत जास्त क्षमतेचे पंप
कळंबोली वसाहतीमध्ये १००, ५० आणि २५ एचपी क्षमतेचे तीन मोठे पंप लावण्यात येणार आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर साचलेले पाणी उपसून ते जलधारण तलावामध्ये सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन पनवेलमध्येसुद्धा पंप बसवण्यात येणार आहेत. पूर्वी कळंबोलीतील पाणी ६० एचपीने उपसा केले जात होते. आता ही क्षमता १६० एचपीवर गेली आहे.
-----------------
पंपिंग हाऊस हस्तांतरित होणार
कळंबोली वसाहतीमध्ये पावसाळ्यात सखल भाग, त्याचबरोबर रस्ते आणि पावसाळी गटारांमध्ये साचणारे पाणी खेचून ते जलधारण तलावामध्ये सोडण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सिंग सिटी हॉस्पिटलजवळ पंपिंग हाऊस कार्यान्वित आहे; परंतु त्याचे सर्व पंप सुरू ठेवले जात नाहीत. त्यामध्ये अनेक तांत्रिक अडथळे आणि बिघाड निर्माण होतो. कधी कधी पंप बंद असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. सध्या ते सिडकोकडे असून ते लवकरच पालिका आपल्याकडे वर्ग करून घेणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.