विजेच्‍या लंपडावमुळे नवी मुंबईकर त्रस्‍त

विजेच्‍या लंपडावमुळे नवी मुंबईकर त्रस्‍त
Published on

विजेच्‍या लपंडावामुळे नवी मुंबईकर त्रस्‍त
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) ः स्मार्ट सिटी म्हणून नवी मुंबई शहराकडे पाहिले जाते, मात्र शहरातील काही भागांत अजूनही प्राथमिक सोयीसुविधांची वानवा आहे. त्यामुळे विजेसारखी मूलभूत गरजही पूर्ण होत नसल्याचा अनुभव गेल्या काही वर्षांपासून घणसोली, तळवळी, गोठीवली, रबाळे या गावांतील रहिवाशांना वारंवार येत आहे. या भागात नेहमी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे येथील रहिवासी विजेच्‍या समस्येने त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी (ता. २३) गोठीवली गावात सकाळी महावितरणकडून अतिधोकादायक असणाऱ्या वृक्षछाटणीकरिता जवळपास १० तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्‍यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
मागील चार-पाच वर्षांत घणसोली, गोठीवली, तळवली या गावांशेजारी अनेक नवीन बांधकामे झाली आहेत. त्यामुळे विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे असले तरी त्या मानाने वीजपुरवठा करणारी साधने अपुरीच आहेत. त्यामुळे विजेची मागणी पाहता येथे नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक मागणी वीजग्राहकांकडून होत असल्याने भूमिगत वीजवाहिन्यांवर ताण पडत असून, येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. महावितरणला विजेची मागणी आणि होणारा पुरवठा यांचा ताळमेळ बसविता येत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
गेल्यावर्षी गोठीवली गावात तब्बल ३६ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. याबाबत माजी आमदार संदीप नाईक यांनी महावितरणला जाबदेखील विचारला होता. याशिवाय वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत आंदोलनदेखील करण्यात आले होते. घणसोली, गोठीवली या भागांत आठवड्यातील दोन ते तीन वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. या भागाला कळवा येथील महावितरणच्या उपकेंद्रामधून वीजपुरवठा केला जातो. पावणे गावातदेखील रोज वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत. शुक्रवारी (ता. २३) सकाळी नऊ वाजता वीजपुरवठा खंडित झाल्यावर तो संध्याकाळी पूर्ववत झाला. त्‍यामुळे ग्रामस्‍थांसह विद्यार्थिवर्गाची मोठी गैरसोय झाली. शिवाय व्‍यावसायिकांचेदेखील मोठे आर्थिक नुकसान झाले. त्‍यामुळे या भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी घणसोली, गोठीवली, तळवली ग्रामस्‍थांकडून करण्यात येत आहे. तर अतिधोकादायक असणाऱ्या वृक्षछाटणीकरिता वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वृक्षछाटणीनंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, असे महावितरणचे उप अभियंता सुनील सरोदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com