

बी-बियाणे पुरवठ्यासाठी विभाग सरसावले
भरारी पथके, तक्रार निवारण समिती स्थापना; खतांच्या गुण नियंत्रणासाठी उपाययोजना
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) ः कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ करिता बियाणे, खते व कीटकनाशके या कृषी निविष्ठांचा दर्जेदार तसेच सुरळीत व वेळेवर मुबलक पुरवठा होण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. निविष्ठांबाबतच्या गुणवत्ता नियंत्रणाकरिता जिल्हा स्तरावर व प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे पथक प्रमुख तर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत. तर तालुकास्तरीय भरारी पथकाचे तालुका कृषी अधिकारी हे पथक प्रमुख असून, पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती खते, बियाणे व कीटकनाशकांच्या प्राप्त तक्रारींची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करणार आहे. खरीप हंगाम २०२५-२६ साठी जिल्ह्यातील ५६ हजार क्षेत्रांसाठी एकूण ५,१९१ क्विंटल बियाणे आवश्यक आहे. तसेच खतांचे एकूण १२,९०७ टन एवढे मंजूर आवंटण आहे. जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा सभेमध्ये पालकमंत्र्यांनी खते, बियाणे वितरण मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या असल्याने चालू खरीप हंगामात कृषी विभागामार्फत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात बियाणे व खतेपुरवठा सुरळीत सुरू झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांमधून आवश्यक कृषी निविष्ठांची खरेदी करून ठेवावी. तसेच बियाणे, खते व कीटकनाशके खरेदीचे पक्के बिल घ्यावे व निविष्ठा वापर करताना सुरक्षा उपायांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही कृषी विभागाकडून देण्यात आले आहेत.
.................
गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन :
जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी सेवा केंद्रामध्ये तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक, भावफलक, साठा फलक, परवाना, तसेच ‘सदर कृषी सेवा केंद्रामध्ये लिंकिंग केले जात नाही’ अशा आशयाचा फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तालुकस्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक ८८३०२६४३३५ वर संपर्क करावा, असे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. ज्या कृषी सेवा केंद्र चालकांकडून नियमांचे आणि दिलेल्या सूचनांचे उल्लंघन होईल, त्यांच्यावर कृषी विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.