पालिकेत १८४हून अधिक वातानुकूलित यंत्र

पालिकेत १८४हून अधिक वातानुकूलित यंत्र
Published on

भिवंडी, ता. २० (बातमीदार) : भिवंडी महापालिकेचे आर्थिक बजेट हजारापेक्षा जास्त असताना वसुली केवळ १० टक्के आहे. असे असताना महापालिकेच्या सर्व इमारतींमध्ये वातानुकूलित कार्यालयात अधिकारीवर्ग बसून आर्थिक प्रगतीसाठी कार्यवाही करताना दिसून येत नाही. केवळ पालिकेच्या सोयीसुविधांचा लाभ घेत आहेत. महापालिकेत सरकारी आदेशांचे उल्लंघन करून १८४हून अधिक वातानुकूलित यंत्र बसवल्याचे प्रकरण समोर आले आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी थेट त्यांच्या कार्यालयातील वातानुकूलित मशीन काढून टाकण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने २५ मे २०२२ मध्ये जारी केलेल्या आदेशानुसार, फक्त ए-३० वेतनश्रेणी (रु. १,४४,२०० ते रु. २,१८,२००) किंवा त्याहून अधिक वेतन असलेल्या अधिकाऱ्यांनाच कार्यालयांमध्ये एसी सुविधा देण्याची परवानगी आहे. असे असूनही भिवंडी महापालिकेत उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक, टंकलेखक यांसारख्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात वातानूकूलित यंत्रणा बसवण्यात आले आहेत. सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे सदस्य करीम अन्सारी यांना माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मिळाली आहे. अन्सारी यांना मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच बांधलेल्या नवीन मुख्यालयाच्या इमारती व्यतिरिक्त, प्रभाग समिती एक ते पाच कार्यालये, जुने मुख्यालय इमारत आणि विविध पालिकेच्या विभागीय कार्यालयात मिळून एकूण १८४हून अधिक एसी बसवण्यात आले आहेत. जे पूर्णपणे सरकारी आदेशाच्या नियमांविरुद्ध आहे.
अनेक वेळा महापालिकेच्या कार्यालयातील अधिकारी वातानुकूलित मशीन सुरू ठेवतात. त्यासोबत पंखेही सुरू ठेवून कार्यालयाचा दरवाजा उघडा असतो. काही वेळा कार्यालयात कोणीही नसताना पंखे, दिवे आणि वातानुकूलित यंत्र सुरू असते. अशा बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेला लाखो रुपयांचे बिल येते. पालिकेच्या मुख्य कार्यालय, आयुक्त बंगला आणि प्रभाग तीनचे कार्यालय येथेच पालिकेने सौर प्रणाली सुरू केलेली असून, त्यामध्ये एसीसह इतर विजेच्या मशीनची निगा दुरुस्तीचा खर्च नागरिकांच्या पैशातून होते. तर इतर कार्यालयांत विजेचे बिल पालिकेला भरावे लागते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
या संदर्भात अन्सारी यांनी महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हा दंडाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले आहे. महापालिका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. करदात्यांच्या पैशातून बेकायदा एसी बसवणे हे केवळ नियमांचे उल्लंघनच नाही तर ते सार्वजनिक पैशांचा गैरवापरही आहे. करदात्यांच्या पैशाचा अपव्यय रोखण्यासाठी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकारी वर्ग नियमित पालिकेचे विविध कर वसूल करत नसल्याने या वर्षी वसुली १० टक्क्यांवर स्थिरावली. नगरपालिका असताना ही वसुली ६०-७० टक्के होती. परंतु, महापालिका झाल्यानंतर या वसुलीला गळती लागली आहे. वसुली नसल्याने गटार पाथवेजची कामे सरकारच्या, मंत्र्यांच्या व आमदारांच्या अनुदानातून केली जात आहेत. नियमानुसार काम होत नसल्याने भिवंडी महापालिकेला मिळणारे अनुदान बंद करावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. विविध खर्चाप्रमाणे वातानुकूलित मशीनचा खर्च आणि वीजबिल पालिकेला भरावा लागत असल्याने ते यंत्र बंद केल्यास अधिकारी वसुलीसाठी कार्यालयाबाहेर पडतील.
- कैलास कर्णकार, शहर सचिव
फोरम फॉर जस्टीस
----------------
मशीन बंद ठेवणे कठीण
भिवंडी महापालिकेच्या इमारती बांधताना त्यामध्ये वातानुकूलित यंत्र लावण्याची तरतूद केलेली असते. त्यामुळे महापालिकेच्या वीज विभागामार्फत त्या ठिकाणी वातानुकूलित मशिनी लावण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत या मशीन बंद ठेवणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया भिवंडी महापालिका वीज विभागप्रमुख सिद्दीकी काझी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com