

विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू
केळवे येथील एका रिसॉर्टमधील घटना
पालघर, ता. २४ (बातमीदार) : केळवे येथे एका रिसॉर्टमध्ये प्रियकारासोबत आलेल्या एका विवाहित महिलेचा शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र मृताच्या नातेवाइकांना मृत महिलेच्या कानातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आल्याने या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला जात आहे.
केळवे येथील दर्या निवास या न्याहारी निवास केंद्रामध्ये एक जोडपे वास्तव्यास होते. शुक्रवारी सायंकाळी विरार आगाशी येथील रहिवासी प्रियांका पवार (वय २७) हिला श्वसनाचा त्रास झाला; परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यानंतर तिला माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्या वेळी तिचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.
महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आला असून, त्याचा विसेरा पुढील तपासासाठी मुंबई येथे पाठवण्यात आला आहे. प्राथमिक अहवाल केळवे पोलिस ठाण्यात दिला असून, मुंबई येथून पुढील अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण सांगता येईल, असे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
मृत महिलेच्या कानामधून रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आल्याने या मृत्यूमागे अन्य कारण असल्याचे नातेवाइकांनी आरोप केले आहेत. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी रात्री केळवे पोलिस ठाण्यामध्ये येऊन या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, मृत झालेल्या महिलेचा प्रियकर हा बोईसर येथे कामाला असल्याचे सांगण्यात आले असून, त्यानेच आपल्या मृत मैत्रिणीला दवाखान्यात नेल्याची माहिती पुढे आली आहे प्रियकराचे काही नातेवाईक शासकीय सेवेत वरिष्ठ पदावर असून, हे प्रकरण दडपून टाकण्याचे प्रयत्न केले जात असल्याचाही आरोप होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.