भिसेगाव-डेक्कन जिमखाना भुयारी मार्ग रद्द

भिसेगाव-डेक्कन जिमखाना भुयारी मार्ग रद्द
Published on

भिसेगाव-डेक्कन जिमखाना भुयारी मार्ग रद्द
उड्डाणपुलासाठी हालचाली सुरू; जागेचा अडसर

कर्जत, ता. २५ (बातमीदार) : डेक्कन जिमखान्याला जोडणारा मध्य रेल्वेच्या अधिपत्याखाली येणारा भुयारी मार्गाचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी भिसेगावातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव रद्द होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
भुयारी मार्गाचे खोदकाम करताना, ते नदीपात्राच्या खालच्या स्तरावर जाईल. परिणामी, पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याचा धोका आहे. त्‍यामुळेच प्रशासनाने भुयारी मार्गासाठी परवानगी नाकारली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कर्जत नगर परिषद आणि रेल्वे प्रशासनाने उड्डाणपुलासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याअनुषंगाने नगर परिषदेचे माजी नगरसेवक संकेत भासे यांच्या पुढाकाराने, कर्जत रेल्वेस्थानकात नुकतीच बैठक झाली. या वेळी नगर परिषदेचे नगर अभियंता मनीष गायकवाड, प्रशासकीय अधिकारी रवी लाड, रेल्वेचे वरिष्ठ अभियंता एस. के. यादव व स्‍थानक प्रबंधक प्रभाषकुमार लाल यादव यांची उपस्थिती होती. बैठकीत उड्डाणपूल तयार करण्याबाबत तांत्रिक बाबी, भू-संपत्तीची उपलब्धता रचना, आणि डेक्कन जिमखान्याजवळील रस्त्यांची लांबी-रुंदी यावर सविस्तर चर्चा झाली.
एमएमआरडीएने यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, परंतु उड्डाणपूल बांधण्यासाठी डेक्कन जिमखाना भागात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने त्याच्या अंमलबजावणीस अडथळा येऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रस्ता खूप अरुंद असल्यामुळे उड्डाणपूल उतरवणे तांत्रिकदृष्ट्या कठीण होणार असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.

यापुढे कर्जत नगर परिषद तांत्रिक समिती नेमून, उड्डाणपूल शक्य आहे का याचा अहवाल तयार करणार आहे. जर तो शक्य वाटला, तर तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केला जाणार आहे. सध्या भिसेगाव बाजूने पुरेशी जागा असून, कर्जत बाजूला जागेची उपलब्धता ही सर्वात मोठी अडचण ठरत आहे.

गेल्या अनेक दशकांपासून भिसेगाव ग्रामस्थांनी कर्जत शहराशी थेट संपर्क होण्यासाठी प्रयत्न केले, मात्र भुयारी मार्गाच्या रद्द झाल्याने आता उड्डाणपुलाची आशा आहे, परंतु जागेच्या अभावामुळे हे स्वप्न अद्याप अधुरेच राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत नगर परिषदेपुढे आता एक मोठे आव्हान आहे - उड्डाणपूल तांत्रिक व व्यवहार्य पद्धतीने उभारण्याचे. भिसेगावकरांसाठी हा एक दीर्घकालीन संघर्ष असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची गरज आहे.
#############
एमएमआरडीएकडून रेल्वे बोर्डास उड्डाणपुलासंदर्भात पत्रव्यवहार झाला आहे. त्यानुसार नगर परिषद वतीने माहिती घेऊन आवश्यक पूर्तता करणार आहोत.

मनीष गायकवाड, नगर अभियंता
#############

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे भुयारी मार्ग रखडला. वेळेत निर्णय घेतले असते, तर भिसेगाव आणि कर्जत शहरांना जोडणारा भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल आजपर्यंत झाला असता. काही तांत्रिक बदल झाल्याने आता भुयारी मार्ग शक्य नसल्याचे रेल्वे अभियंत्यांनी सांगितले आहे. प्रस्तावित उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करणार आहोत.

अमोघ कुलकर्णी, ग्रामस्थ, भिसेगाव
##################

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com