उल्हासनगर ‘कचराकोंडी’त अडकले!

उल्हासनगर ‘कचराकोंडी’त अडकले!
Published on

नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २५ : पावसाच्या सुरुवातीलाच उल्हासनगर शहरात गंभीर कचरा संकट निर्माण झाले आहे. शहरातील एकमेव गायकवाड पाडा कचराभूमीवर स्थानिक रहिवाशांनी पुन्हा एकदा कचरा टाकण्यास कडाडून विरोध केल्याने, महापालिकेच्या घंटागाड्यांनी कचरा उचलणे पूर्णपणे बंद केले आहे. परिणामी, शहरातील मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळांपर्यंत कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. घाण, दुर्गंधी आणि रोगराईचा धोका प्रचंड वाढला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, शहर प्रशासनाच्या अपयशावर जनतेत तीव्र संताप निर्माण झाला आहे.
साडेपाच लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या उल्हासनगर शहरात दररोज सुमारे ४०० मॅट्रिक टन कचरा निर्माण होतो. काही वर्षांपासून महापालिकेकडे स्वतःची अधिकृत कचराभूमी नाही. सुरुवातीला खेमानी भागात असलेली कचराभूमी बंद झाल्यानंतर, तात्पुरत्या उपाययोजनांखाली कॅम्प ५ मधील गायकवाड पाडा परिसरातील खाणीत कचरा टाकण्यास सुरुवात झाली. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यावर व जीवनमानावर विपरित परिणाम होत असल्याने त्यांनी वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले. काही दिवसांपासून पावसाच्या सरी सुरू असतानाच रहिवाशांनी पुन्हा एकदा कचरा गाड्यांना विरोध करत गायकवाड पाडा कचराभूमी बंद पाडली. त्यामुळे संपूर्ण शहरात घंटागाड्या थांबल्या आहेत. चार ते पाच दिवसांपासून कचरा न उचलल्याने शहरात दुर्गंधीयुक्त परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहरातील विविध भागांत कचरा कुजू लागला आहे. डास, माशा आणि आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घनकचऱ्याचे कोणतेही वर्गीकरण, प्रक्रिया यंत्रणा नसल्यामुळे या कचराभूमीत अनेक वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. उन्हाळ्यात कचऱ्याच्या विघटनामुळे गॅस निर्माण होऊन पेट घेते. तर पावसात या कचऱ्यातून काळे, दुर्गंधीयुक्त पाणी शेजारच्या वसाहतींमध्ये वाहते. परिणामी, श्वसन विकार, त्वचारोग, संसर्गजन्य आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिकांची मागणी
* महापालिकेने तत्काळ शहरासाठी शाश्वत कचराभूमी विकसित करावी
* शहरात ‘डोअर टू डोअर’ कचरा वर्गीकरण सुरू करावे
* घंटागाड्या नियमित सुरू कराव्यात
* गायकवाड पाडा परिसरात वैद्यकीय पथक तैनात करून आरोग्य चाचण्या घ्याव्यात.

महत्त्वाचे मुद्दे
* दररोज ४०० मॅट्रिक टन कचरा; पण कायमस्वरूपी कचराभूमी नाही
* रहिवाशांचा विरोध, गायकवाड पाडा कचराभूमी बंद
* पावसात कचरा कुजून दुर्गंधी, संसर्गाचा धोका

गायकवाड पाडा परिसरात सातत्याने होणाऱ्या कचराप्रश्नी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आज आरोग्यासाठी लढा देत आहोत. कचऱ्यामुळे दुर्गंधी, रोगराई आणि अपघातांचा धोका वाढला आहे. ही केवळ आमची नाही तर संपूर्ण शहराची समस्या आहे. महापालिकेने वेळकाढूपणा थांबवून तातडीने उपाययोजना कराव्यात. शहराच्या स्वच्छतेस विरोध करत नाही; पण घराजवळ घाण आणि मृत्यूचे वातावरण निर्माण होऊ देणार नाही. वेळेवर उपाय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- योगेश म्हात्रे, भाजप पदाधिकारी

डम्पिंग ग्राउंड परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने कचरा उचलण्याचे काम संथ गतीने सुरू होते. कचऱ्याच्या गाड्या तिथपर्यंत जाण्यात अडचणी येत आहेत. मात्र, लवकरात लवकर सर्व कामे सुरळीत सुरू होईल.
- मनीष हिवरे, पालिका अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com