लाईव्ह न्यूज

अवकाळी पावसाने वाढला संसर्गाचा धोका

अवकाळी पावसाने वाढला संसर्गाचा धोका
Published on: 

वाशी, ता. २५ (बातमीदार) : यंदा राज्यात मॉन्सून लवकर दाखल होणार आहे. मॉन्सूनपूर्व पावसाने सध्या नवी मुंबई शहरासह राज्यात बहुतांश ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसात संसर्गाचा धोका वाढला आहे. शहरातील दवाखान्यांमध्ये उलट्या, जुलाब, तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांची आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
पाण्यातून व उघड्यावरील अन्नामुळे सतत उलट्या, जुलाब, ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास होतो. विशेषत: स्त्रियांमध्ये हात-पाय दुखणे, मुलांमध्ये पोट दुखण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. घरातील पिण्याचे पाणी शुद्ध असणे आवश्यक आहे. अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे जलजन्य आजार या दिवसांत अधिक पसरण्याचा धोका आहे. लहान मुलांना त्याची लगेचच बाधा होते. पाऊस थांबल्यानंतर साचलेल्या पाण्यामुळे डेंगी, मलेरियासारख्या साथरोगांचा फैलाव होण्याचा धोका अधिक आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे व मोकळ्या भूखंडांवर सखल भागात पाणी साचत असते. अशा दूषित पाण्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस या जीवाणूजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात पुरेशी स्वच्छता पाळावी, पाणी साचू देऊ नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दूषित पाणी व मातीशी नागरिकांनी संपर्क टाळावा. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवावे, वैयक्तिक स्वच्छता ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
--------------------
अस्वच्छतेने रोगराई
पावसाळ्यात घरासभोवताली जीवजंतूंची निर्मिती होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, पोटदुखी, उलट्या, मळमळ, डोळे लाल होणे, त्वचा पिवळी आदी आजाराची लक्षणे आहेत. पावसाळ्यात खोकला, छातीत दुखणे, लघवी कमी होणे आदी लक्षणे दिसून येतात. या रोगाची लक्षणे आढळून येताच, तसेच जखम असल्यास पूर्ण खबरदारी घेणे गरजेचे ठरते. अन्यथा या रोगाचे प्रमाण शरीरात आणखी वाढून मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकते.
-------------------
अचानक झालेल्या हवामान बदलामुळे मानवी शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. शरीराची धारण क्षमता कमी झाल्याने उलट्या जुलाब, पोटदुखीसारख्या समस्या उद्‍भवतात. विशेषत: पावसाळ्यात रस्त्यांवर साठणाऱ्या पाण्यामुळे लेप्टोपायरसिस या आजाराचा धोका अधिक संभवतो. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्याचा संपर्क टाळावा. घरी आल्यावर गरम पाण्याने हात-पाय स्वच्छ धुऊन घ्यावेत.
- डॉ. प्रतीक तांबे, जनरल फिजिशियन
------------------
नागरिकांमध्ये बाहेरील जंकफूड, चटपटीत खाद्यपदार्थ, मांसाहार सेवनाचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाणी, शिळ्या अन्नामुळे जंतूसंसर्गाचा धोका अधिक बळावतो. पावसामुळे आणि हवेतील आर्द्रतेमुळे रोगजंतूंच्या वाढीस पोषक वातावरण आहे. ते मानवी शरीरासाठी घातक ठरत आहे. बुरशीजन्य अन्न खाण्यात आल्यास विषाणूजन्य आजाराची शक्यता वाढते.
- डॉ. सुधीर बांगर, फिजिशियन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com