उन्हाळी कॅम्पच्या नावाखाली चिमुकल्याचे शोषण

उन्हाळी कॅम्पच्या नावाखाली चिमुकल्याचे शोषण
Published on

उन्हाळी शिबिराच्या नावाखाली चिमुकल्याचे शोषण
नराधम शिक्षकाला पाच दिवसांची कोठडी

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान लहानग्यांना नृत्य, गायन, कला यांसारख्या कौशल्यांचे धडे देण्यासाठी आयोजित केला जाणारा समर कॅम्प चिमुकल्यांच्या आनंदासाठी असतो; मात्र उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ येथील एका समर कॅम्पमध्ये घडलेली विकृत घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. या कॅम्पमध्ये डान्स शिकवणाऱ्या एका ४५ वर्षीय शिक्षकाने अडीच वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

उल्हासनगर कॅम्प ४ मधील एका खासगी क्लासमध्ये उन्हाळी सुट्टीदरम्यान समर कॅम्प भरवला होता. या कॅम्पमध्ये अनेक लहान मुले सहभागी झाली होती. याच कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या एका अडीच वर्षांच्या मुलाला कॅम्पहून घरी आल्यावर शारीरिक वेदना जाणवू लागल्या. याबाबत पालकांनी विचारणा केली असता त्या बालकाने अत्यंत भोळेपणाने डान्स शिक्षकाने केलेल्या विकृत कृत्याबद्दल सांगितले. या प्रकाराने हादरलेल्या पालकांनी तात्काळ विठ्ठलवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने कारवाई केली.

डान्स शिक्षक जितेंद्र दुलानी (वय ४५) याच्या राहत्या घरी मध्यरात्री छापा टाकून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान आरोपीचे पूर्वीचे रेकॉर्ड, इतर समर कॅम्पशी संबंध आणि इतर चिमुकल्यांसोबतदेखील असे काही कृत्य केले आहे का, याबाबतचीही तपासणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com