थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

पेणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
पेण (बातमीदार) ः महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालय येथे नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी इयत्ता दहावीमधील १० विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
श्रावणी शिंदे, अनन्या सई, पार्थ सावंत, यशश्री म्हात्रे आदी विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवल्याने त्‍यांचा मान्यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्यात आला. या वेळी महात्मा गांधी वाचनालय व ग्रंथालय पेणचे अध्यक्ष अरविंद वनगे, उपाध्यक्ष सपना पाटील, कार्यकारी मंडळाचे सदस्य, वाचकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............................
एमसीएच्या महिला क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर
पोयनाड (बातमीदार) : एमसीएच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरजिल्हा १५ वर्षांखालील महिला क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. खोपोली येथील निशिता विठलानी ही रायगडच्या संघाचे नेतृत्व करणार असून, रायगड जिल्ह्याचा संघ २९ मेपासून एमसीएच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरजिल्हा महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. या महिला क्रिकेट संघात निशिता विठलानी कर्णधार, ब्रताती राय उपकर्णधार, मधुरा बाबर यष्टिरक्षक, जिज्ञासा कडू यष्टिरक्षक, निर्मयी चुनेकर, श्रीजा वाघमोडे, स्तुती विठलानी, आरोही लोखंडे, प्रियांसी गायकवाड, आरुषी जाधव, ज्ञानेश्वरी येरूणकर, काव्या माने, सान्वी कुमार, वैदेही वावेकर यांचा समावेश असणार आहे, तर राखीव खेळाडू म्हणून स्वरा साळुंके, गीतांजली शर्मा, दिव्यांका धनावटे, प्राची शिंदे, वेदिका धनानी, अद्विता जाधव, वैष्णवी जाधव, दुर्वश्री साळुंके, त्रिशा सिंग यांचा समावेश आहे. वरील निवडलेला संघ पहिल्या दोन सामन्यांसाठी असणार आहे. मुलींच्या निवड चाचणी शिबिराचे आयोजन नुकतेच खारघर येथील बी. पी. पाटील क्रिकेट अकॅडमी येथे करण्यात आले होते. शिबिरामध्ये मुख्य प्रशिक्षक व निवडकर्ता म्हणून नयन कट्टा व विनय पाटील यांनी काम पाहिले. आरडीसीएचे उपाध्यक्ष राजेश पाटील, सहसचिव जयंत नाईक, सदस्य प्रदीप खलाटे यांनी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिरासाठी उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन केले. आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
....................
माणगावमध्ये आजी-माजी सैनिकांचा सत्‍कार
माणगाव (बातमीदार) ः माणगावमध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘तिरंगा यात्रा’ कार्यक्रमात आजी-माजी सैनिकांचा सत्‍कार करण्यात आला. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, पाकिस्तान मुर्दाबाद, ऑपरेशन सिंदूरचा विजय असो अशा घोषणा देत मोठ्या उत्साहात हा अभिवादन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी समस्त माणगाव शहर व तालुक्यातील नागरिक यांच्यातर्फे आजी-माजी सैनिकांसह कुटुंबातील आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात पाकिस्तान विषयी प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या कृत्यामुळे संपूर्ण देशाचे मन व्यथित झाले. या घटनेला प्रत्युत्तर म्हणून केंद्र सरकार व भारतीय जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर जोरदार कारवाई केली. भारतीय वीर जवान आपले प्राण पणाला लावून देशाच्या सुरक्षिततेसाठी सतत तत्पर असतात, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व संपूर्ण देशातील नागरिक हे जवानांसोबत आहेत, हा संदेश पोहोचवण्यासाठी माणगाव शहर व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी बसस्थानक येथून कचेरी रोड मार्ग ते वीर यशवंत घाडगे स्मारक अशी ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. ही तिरंगा यात्रा शहीद स्मारकापर्यंत पोहोचल्यावर या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले माणगाव तालुक्याचे सुपुत्र रुपेश गायकवाड यांचा तसेच तालुक्यातील आजी-माजी सैनिक व कुटुंबीयांचा तसेच वारसदारांचा सत्कार करण्यात आला.
.................
गिरणे जलजीवन योजनेअंतर्गत कामात भ्रष्टाचार
ग्रामस्‍थांचा आरोप; तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा
तळा, ता. २४ (बातमीदार) ः गिरणे जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून केवळ पैशांचा चुराडा होत असल्याचा आरोप ग्रामस्‍थांकडून करण्यात येत आहे. त्‍यामुळे या प्रकल्‍पातील ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी गिरणे ग्रामस्‍थांकडून करण्यात येत आहे. या आशयाचे निवेदन नुकतेच तहसीलदार स्‍वाती पाटील यांना दिले आहे. तसेच कारवाई न केल्यास २९ मे रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी गिरणे ग्रामपंचायत माजी सरपंच गोविंद कीर्तने, पाणी कमेटी अध्यक्ष सुभाष पाशिलकर, जनार्दन कीर्तने, विजय ताम्हणकर, मनोज चाळके या वेळी उपस्थित होते.
गिरणे येथे १५ लाख रुपये खर्च करून पाणी योजनेचे काम करण्यात आले आहे. यामध्ये बोअरवेलसाठी ३८ हजार, पम्पिंग मशिनरीसाठी ९४ हजार, पाइपलाइनसाठी लाखाे रुपये खर्च करण्यात आले आहेत, परंतु या अंदाजपत्रकानुसार ठेकेदाराने काम केले नसल्याचा आरोप गिरणे ग्रामस्‍थांनी केले आहे. विशेष म्‍हणजे गावातून अद्यापही पाइपलाइन‌ फिरलेली नाही, ज्या ठिकाणी पाइपलाइन टाकण्यात आली आहे तेथून घरे ही जवळ जवळ १०० फुटांवर उंच ठिकाणी आहे. त्‍यामुळे घरापर्यंत पाणी पोहोचत नसल्याची ओरड ग्रामस्‍थांकडून करण्यात येत आहे. तसेच मधल्या काळात योजनेचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी असलेले अधिकारी कामाच्या ठिकाणी फिरकले नसल्यचा आरोप ग्रामस्‍थांनी केले आहेत. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी लागणारी वीज किंवा सौरऊर्जा नसताना चाचणीसाठी २६ हजार रुपये खर्च दाखवून या बिलाचे सर्व पैसे ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत. अनेक वेळ ग्रामस्थांनी हे बोगस काम बंद पाडले, परंतु याबद्दल कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तळा पंचायत समिती गटविकास अधिकारी महादेव शिंदे यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडूनदेखील कुठल्याही प्रकारचे सहकार्य ग्रामस्थांना मिळाले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे या कंत्राटाच्‍या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्‍थांनी केली आहे.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com