कंटेनर कलंडल्याने वाहतूक कोंडी

कंटेनर कलंडल्याने वाहतूक कोंडी
Published on

कंटेनर पलटल्याने भिवंडी-वाडा रस्त्यावर वाहतूक कोंडी
भिवंडी, ता. २५ (वार्ताहर) : पावसाळ्याआधीच भिवंडी-वाडा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांना सुरुवात झाली आहे. या रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता नादुरुस्त तर काही ठिकाणी खोदलेल्या अवस्थेत आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास अंदाज न आल्याने कंटेनर रस्त्याच्या खाली उतरून पलटला. या वेळी मोठी दुर्घटना झाली नाही. पण, वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्या‍मुळे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या मार्गावर सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

भिवंडीत भाजप महिला मॅरेथॉन
भिवंडी (वार्ताहर) : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रम महाराष्ट्रभर घेण्याचा संकल्प केला आहे. त्याअंतर्गत भाजप शहर महिला मोर्चा अध्यक्षा सुनीता टावरे यांच्या नेतृत्वाखाली महिला मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील चाचा नेहरू हिंदी हायस्कूल ते आदर्श पार्क येथील नाना-नानी पार्कपर्यंत मॅरेथॉन स्पर्धेला भाजप शहराध्यक्ष रवी सावंत यांनी हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा सुनीता टावरेंसह महिला पदाधिकारी कल्पना शर्मा, निर्मला टावरे, ममता परमाणी, मनीषा भांगरे, यशवंती बिल्लावा, वैशाली पाटील, भावना पोद्दार, शोभा तिवारी, शीला बेगडे, उत्तर मंडळ अध्यक्ष भावेश पाटील यांसह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे या मॅरेथॉनमध्ये अनेक महिला नऊवारी साडीत; तसेच पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेमध्ये पारितोषिक पटकावणाऱ्या महिलांसाठी पैठणी साड्या भेट देण्यात आल्या.

माळशेज घाटात वाहतूक सुरळीतपणे सुरू
मुरबाड, ता. २५ (वार्ताहर) : मुरबाड-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माळशेज घाटात गुरुवारी (ता. २२) पहाटे ४.३० सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली होती. येथे कोणत्याही प्रकारची जीवितहानी घटना घडली नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर तत्काळ दरड बाजूला करण्यात आली. त्यानंतर आता मुरबाड माळशेज घाटात सुरळीतपणे दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे. दरम्यान, माळशेज घाटात रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे वाहनचालकांनी काळजी घेऊन घाटात प्रवास करावा, असे आवाहन मुरबाड माळशेज घाट महामार्ग पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोक क्रांती संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड
मुरबाड (बातमीदार) : लोक क्रांती संघटनेच्या ठाणे जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची शनिवारी (ता. २५) नियुक्ती करण्यात आली. मुरबाड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात नवीन नियुक्ती जाहीर केल्या. त्यामध्ये ठाणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शिवाजी भिसे, तर ठाणे जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षपदी माया ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली. लोक क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रा. नरेश मोरे यांच्या उपस्थितीमध्ये कल्याण शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून वैष्णवी सावर्डेकर, मुरबाड शहराध्यक्ष विलास जाधव, मुरबाड शहर समता विभाग अध्यक्ष अनिल सुरडकर, मुरबाड शहर व विभाग महिला आघाडी अध्यक्ष पूनम सिंग यांची निवड जाहीर केली. या वेळी मुरबाड नगरपंचायतीचे नगरसेवक व संघटनेचे राष्ट्रीय सदस्य जगन्नाथ माळी, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गायकर, सामाजिक कार्यकर्ते नामदेव गायकवाड, शंकर गोहील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना मुंबईचे ठाणे जिल्हाध्यक्ष शंकर करडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विलास जाधव यांनी मानले.

मुरबाड : लोक क्रांती संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड मुरबाड येथे जाहीर करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर
मुरबाड, ता. २५ (वार्ताहर) : महसूल विभाग महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व तहसील कार्यालय मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिराचे आयोजन कमल कथोरे महाविद्यालय म्हसा येथे गुरुवारी (ता. २२) केले होते. शिबिराचे उद्‍घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी तहसीलदार अभिजित देशमुख, नायब तहसीलदार अमोल शिंदे, टीडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, कान्होळ ग्रामपंचायत सरपंच रेश्मा घरत, भाजप कार्यकर्ते बाळा घरत उपस्थित होते. या वर्षीचे हे तालुक्यातील पहिलेच शिबिर असून, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, वय व राष्ट्रीय अधिवास प्रमाणपत्र, १५ वर्षे स्थानिक वास्तव्याचा दाखला, दुय्यम शिधापत्रिका, शिधापत्रिकेत नाव वाढविणे कमी-करणे अशा प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ व दाखल्यांचे वाटप एका छताखाली नागरिकांना यावेळी दिला. या शिबिरासाठी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेऊन लाभ घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी बाळा घरत आणि म्हसा व देहरी महसूल मंडळ, तसेच महसूल कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

महामार्गालगत बाजार भरवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई
पडघा, ता. २५ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे मुंबई-नाशिक महामार्गालगत आठवडा बाजार भरवणाऱ्या दुकानदारांवर ग्रामपंचातीने कारवाई केली. ‘महामार्गावर आठवडा बाजार’ या मथळ्याखाली १२ मे रोजी ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत पडघा ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र विशे, कमिटी व कर्मचाऱ्यांनी मैदानात उतरून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यानंतर महामार्गालगत बाजार भरवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करत त्यांना महामार्गापासून चार फूट मागे दुकाने घ्यायला लावली. तसेच वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या प्रवासी वाहतूक रिक्षा व खासगी वाहने हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, चिंबीपाडा, शेरेकरपाडा, गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आठवडा बाजार जैसे थे भरल्याने आणि बाजारासाठी आलेल्या नागरिकांनी तिथेच गाड्या पार्किंग करूनही त्यांच्यावर ग्रामपंचायतीने काहीच कारवाई केली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
पडघा : महामार्गावरील आडवडा बाजारातील दुकानदारांवर कारवाई करताना सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com