हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे तब्बल साडेचार वर्षे दुकानात गाडून
पाठलाग
संजय भोईर
भिवंडीतून साडेचार वर्षांपूर्वी एक अल्पवयीन मुलगा बेपत्ता होण्याची घटना घडली होती. त्याच्या शोधासाठी कुटुंबीयांनी जंग जंग पछाडले. परिसरातील नागरिकांसह तेथील मशिदीमध्ये अजान देणारा बांगी याने सुद्धा प्रयत्न केले. एवढेच नाही तर मुलगा घरी परत येण्यासाठी अजमेर शरीफ येथे जाऊन दुवा तावीज करण्यास सांगून कुराणखानी फातिया करून बकरे कापायला लावले. त्याचे जेवण बांगीने खाल्ले. कालांतराने मुलगा सापडेल असा विश्वास देणाऱ्या बांगीनेच मुलाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले आणि आपल्याच दुकानात गाडून ठेवले, असे उघड झाले. ‘दृश्यम’ चित्रपटाला लाजवेल असाच काहीसा गुन्हा भिवंडीत गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे.
------
भिवंडी शहरातील नवी बस्ती नेहरूनगर येथील शोएब शेख हा १७ वर्षीय युवक कुटुंबासोबत राहत होता. घरात एकुलता एक मुलगा असल्याने संपूर्ण कुटुंबाचे प्रेम त्याच्यावर होते. २० नोव्हेंबर २०२० मध्ये तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी शोध घेऊनही सापडला नसल्याने भिवंडी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शोएब अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने पोलिसांनाही शोधकार्य करण्यात अपयश येत होते. कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकही शोएबचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामध्ये या परिसरात मशिदीमध्ये बांग देण्याचे काम करणारा मौलवी गुलाम रब्बानी शेख हा सुद्धा होता. त्याचे त्याच परिसरात छोटे किराणा दुकान होते. त्या जोडीला दुवा तावीज देऊन बाबगगिरी सुद्धा करत होता. त्याने कुटुंबीयांना शोएब सापडेल, असा विश्वास दिला होता. त्यासाठी कधी त्याने अजमेर शरीफ येथे जाऊन प्रार्थना करण्याचा सल्ला दिला, तर घरात कुराणखानी व फातिया करण्यास सांगून बकऱ्याचे जेवण देण्यास सांगितले. त्याचे मटण शेख याने सुद्धा खाल्ले होते. पण तरी शोएब काही सापडला नाही. दरम्यान २०२३ मध्ये शोएबच्या आईला कोणीतरी मुलाचे अपहरण व हत्येमध्ये शेखचा सहभाग असल्याची खबर दिली. परिसरातील सर्व नागरिक त्याच्या दुकानावर पोहचले. त्याला घेऊन शहर पोलिस ठाण्यात गेले. तेथे चौकशी सुरू असताना शेखने पोलिस ठाण्यात झालेल्या गर्दीचा फायदा घेत तेथून पोबारा केला.
याच परिसरातील एका अल्पवयीन मुलाने त्याच्याविरोधात अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉस्कोअंतर्गत गुन्हासुद्धा दाखल केला होता. शेख फरार होता, तर शोएबचे अपहरण करून नक्की काय केले, याचा पोलिसांना सुगाव लागत नव्हता.
फरार झालेला हा मौलवी दिल्लीमार्गे उत्तराखंडच्या रुडकी जिल्ह्यात गेला आणि तिथे ओळख बदलून एका मशिदीमध्ये पुन्हा मौलवी म्हणून आजान देण्याचे काम करू लागला. तेथे झालेल्या एका वादात त्याने ‘मी कित्येकांना कापून गाडले आहे’, असे धमकीवजा विधान केले. ही माहिती एकाने तेथील स्थानिक पोलिसांना दिली. त्यांनी त्याला पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यास सुरुवात केली. तर तो भिवंडी येथील गुन्ह्यात फरार असल्याचे समोर आले. त्यानंतर ठाणे पोलिस आयुक्तालयातील मालमत्ता कक्षातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांना ही माहिती मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. वाय. मलिक, पोलिस हवालदार सचिन कोळी, प्रशांत भुरके, संदीप भांगरे या पथकाने उत्तराखंड येथे जाऊन शेखला ताब्यात घेतले.
कसा झाला गुन्हा?
मौलवी गुलाम रब्बानी शेख याची पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. शेखचे नेहरूनगर येथे छोटे किराणा जनरल स्टोअर दुकान होते. त्याच्या दुकानात काम करण्यासाठी असलेल्या अल्पवयीन मुलावर शेख अनैसर्गिक शारीरिक अत्याचार करत होता. एकदा हे कृत्य शोएबने बघितले. त्यानंतर शोएबचे तोंड बंद राहावे म्हणून कधी खाऊ तर कधी पैसे द्यायला लागला. पण नंतर शोएबची हाव वाढली. तो अधिक पैसे मागू लागला. घरासाठी घेतलेल्या सामानाचे पैसे न देण्याचे प्रकार वाढले. शोएब भविष्यात त्रासदायक ठरू शकतो, ही भीती त्याच्या मनात होती. म्हणून शोएबचाच काटा काढण्याची योजना शेखने आखली. त्याला पैसे घेण्यासाठी दुकानात बोलावून गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची म्हणून दुकानातच खड्डा खोदला आणि शोएबचा मृतदेह गाडला. त्यानंतर शोएबच्या बेपत्ता असलेल्या काळात त्याने कुटुंबीयांना मदत करत धीर देत राहिला. आठ महिन्यांनी मृतदेह गाडलेल्या ठिकाणी जमीन फुगीर झाल्याने मृतदेह बाहेर पडेल आणि आपले बिंग फुटेल या भीतीने त्याने पुन्हा मृतदेह उकरून बाहेर काढला. काही अवयवांचे बारीक तुकडे करून रस्त्यावरील कचऱ्यात फेकले. तर उर्वरित पुन्हा दुकानात गाडून फरशी लावून घेतली. पोलिस पथकाने आरोपी शेखला भिवंडीत आणून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने दुकानातील मृतदेहाचे काही अवशेष हस्तगत करत हत्येला वाचा फुटली. ही घटना अक्षरशः एखाद्या थरारक चित्रपटात घडावी, अशी असून अनेकांना अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटाची आठवण करून देणारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.