गृहसंकुलातील बसमुळे कोंडीची समस्या

गृहसंकुलातील बसमुळे कोंडीची समस्या
Published on

गृहसंकुलातील बसमुळे कोंडीची समस्या
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : रस्त्यांची सुरू असलेली कामे, त्यात वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येने प्रवाशांच्या नाकी नऊ आणले आहेत. त्यातच दुसरीकडे मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर खासगी बस उभ्या केल्या जात आहेत. यामुळे या कोंडीत आणखी भर पडली आहे. वाहतूक पोलिस वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करतात; मात्र या खासगी बसना अभय दिले जात आहे. याविरोधात तक्रार करूनदेखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

डोंबिवली शहरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे, यामुळे कोंडीची समस्या तीव्र आहे. अरुंद रस्ते, रस्त्यांची सुरू असलेली काँक्रीटीकरणाची कामे, वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते यामुळे या कोंडीत भर पडते; मात्र वर्दळीच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या बड्या गृहसंकुलाच्या खासगी बस कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. डोंबिवली पूर्वेला फडके रोड, भगतसिंग रोड, सर्व्हेश सभागृहाजवळील टिळक रोड या रस्त्यांवर ग्रामीण भागातील गृहसंकुलाच्या बस सकाळ, दुपार, संध्याकाळ उभ्या केल्या जातात. हे तिन्ही रस्ते वाहनांनी सतत गजबजलेले असल्याने खासगी बसना या रस्त्यांवर थांबा देऊ नये, अशी मागणी प्रवाशांकडून गेली कित्येक वर्षे होत आहे, मात्र या बस येथून हटण्याऐवजी त्यात वाढ होत आहे.

बस उभ्या राहिल्याने त्या वेळेस इतर मोठी वाहने आल्यास त्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. या खासगी बसना अधिकृतरित्या बसथांबा देण्यात आला नसून बेकायदा ही वाहने रस्त्यावर उभी केली जातात. स्टेशन परिसरात फेरीवाले, रिक्षा, खरेदीसाठी आलेले वाहनचालक, परिवहनच्या बसची वर्दळ असते तरीदेखील फडके रोडवर खासगी बसेस उभ्या केल्या जातात. यामुळे अनेकदा पादचाऱ्यांना तर चालावे कोठून, असा प्रश्न निर्माण होतो.

वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होते. वाहतूक पोलिस, ट्रॅफीक वॉर्डन ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर असे सावज हेरण्यासाठी दररोज उभे असतात, मात्र कोंडीत भर घालणाऱ्या या खासगी बसवर मात्र कोणतीही कारवाई होत नाही. अनेकदा या बसेसमुळे कोंडी झाल्याची तक्रार फोनद्वारे नागरिक वाहतूक पोलिसांकडे करतात, मात्र त्याची दखल आतापर्यंत घेतली गेलेली नाही.

बेकायदा रिक्षाथांबे
खासगी बस एखाद्या ठिकाणी उभ्या राहिल्या की कालांतराने तो त्यांच्या हक्काचा थांबा असल्यासारख्या त्या बस तेथे दररोज उभ्या केल्या जातात. बस उभ्या राहिल्या की त्यांच्यापाठी रिक्षांचादेखील नवा थांबा त्या रस्त्यावर निर्माण होतो. वाहतूक पोलिस या बेकायदा रिक्षांच्या वाहनतळावरदेखील कारवाई करत नाही. पीपी चेंबर येथे असाच बेकायदा रिक्षा थांबा खासगी बसथांब्याच्या ठिकाणी निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com