काँक्रिट रस्त्याची कामे रखडली!
काँक्रीट रस्त्याची कामे रखडली!
५५ टक्के अपूर्ण रस्ते, थांबवलेली कामे आता पावसाळ्यानंतर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः मुंबईत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची सुरू केलेली कामे निम्मीही पूर्ण झालेली नाहीत. अपूर्ण असलेली ५५ टक्के कामे ढेपाळली असून, रस्ते कामाच्या नियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत. पावसाळ्यात या कामांमुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, अपूर्ण राहिलेली कामे आता पावसामुळे थांबवली असून, ही कामे पावसाळ्यानंतर केली जाणार आहेत.
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. २० मेपर्यंत सर्व रस्ते वापरायोग्य करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने दिल्या होत्या, मात्र आतापर्यंत ३०८ किमीचे रस्ते वापरायोग्य झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील पहिल्या टप्प्यातील २४ टक्के, दुसऱ्या टप्प्यातील चार टक्के म्हणजे एकूण २८ टक्के काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. अजूनही सुमारे ९८९ म्हणजेच ४०० किमी रस्त्यांचे काम सुरू असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. याचा अर्थ पालिका प्रशासनाची डेडलाइन हुकली आहे. टप्पा-१मधील ७५ टक्के कामे आणि टप्पा दोनमधील ५० टक्के कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करायची आहेत.
मुंबईकरांचे हाल होणार
पावसाळा तोंडावर आला तरी रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. रस्ते बांधकामासाठी मुंबईत ठिकठिकाणी खोदकाम झाले आहे. रस्ते अपूर्ण राहिल्यामुळे रहदारीला अडथळे निर्माण झाले आहेत. अनेक रस्त्यांवरून नीट चालता येणार नाही. पावसाळ्याआधी ते पूर्ण न झाल्यास मुंबईकरांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.
सीसी रोडची सद्य:स्थिती
पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते), दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१,४२० रस्ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रीटीकरण्यासाठी हाती घेण्यात आले आहेत.
- पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झालेल रस्ते - २८९
- कामे सुरू असलेले रस्ते - २८५
- दुसऱ्या टप्प्यातील पूर्ण झालेले रस्ते - १०१
- कामे सुरू असलेले रस्ते - ७०४
काँक्रीटीकरण कामांची सद्य:स्थिती
पहिला टप्पा - रस्त्यांची संख्या - किमी - टक्केवारी
एकूण - ७०० - ३२०.६ किमी
पूर्ण - २८९ - ७९. ८३ किमी - २४. ९० टक्के
सुरू - २८५- १८९. ४२ किमी - ५९. ०८ टक्के
सुरुवात नाही - ११४- ४७. ९१ किमी - १४. ९५ टक्के
दुसरा टप्पा - रस्त्यांची संख्या - किमी - टक्केवारी
एकूण - १४२१ - ३७८. ९ किमी
पूर्ण - १०१- १५. ०४ किमी - ३. ९७ टक्के
सुरू - ७०४- २११.किमी - ५५. ८६ टक्के
सुरुवात नाही - ६१४- १५२. १२ किमी - ४०. १५ टक्के
अतिरिक्त आयुक्तांकडून सातत्याने पाहणी
गेल्या कित्येक दिवसांपासून अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर हे मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाची पाहणी करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी मुंबई, उपनगरांमधील महत्त्वाच्या ठिकाणांवरील रस्ते बांधकामांच्या कामाची पाहणी, गुणवत्ता तपासण्याचे काम केले आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत आयआयटी मुंबईचे प्राध्यापक, पालिका रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता यांच्यासह गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित असतात. एवढे करूनही रस्ते बांधकामाची डेडलाइन का हुकली, हा प्रश्न आता विचारला जात आहे.
काँक्रीट रस्त्यांची कामे आटोपती घेत असताना पावसाळ्यादरम्यान मुंबईकर नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना पालिकेच्या सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.
- अभिजित बांगर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प)
मुंबईत रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांची डेडलाइन हुकली आहे. याचा मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. सिमेंट रोड बांधकामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. एसीबीमार्फत याची चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा.
- वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेस अध्यक्ष
कंत्राटदारांना पालिका प्रशासनाचा धाक उरला नाही. ठेकेदारांचे लोकप्रतिनिधींसोबत साटेलोटे असल्यामुळे त्यांच्यावर थातूरमातूर कारवाई केली जाते. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्ते बांधकामाची डेडलाइन हुकली आहे.
- संतोष दौंडकर, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.