क्लस्टरअभावी इमारतींचा पूनर्विकास रखडला

क्लस्टरअभावी इमारतींचा पूनर्विकास रखडला
Published on

भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : धोकादायक व अनधिकृत इमारतींचा पूनर्विकास व्हावा, यासाठी मिरा-भाईंदर शहरात क्लस्टर (समूह पुनर्विकास) योजना लागू करण्यात आली आहे. परंतु गेल्या दोन वर्षांत या योजनेने कोणतीही प्रगती केलेली नाही. परिणामी मोडकळीस आलेल्या इमारतींचा पूनर्विकास रखडला आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींमधील शेकडो रहिवासी आता आंदोलनाच्या पवित्र्यात उभे ठाकले असून आम्हाला क्लस्टर नकोच, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.

मिरा-भाईंदरमधील ग्रामपंचायत काळात विकसकांनी चटई क्षेत्राचा वारेपाम उपयोग करून इमारती बांधल्या. आज या इमारती अनधिकृत ठरल्या आहेत. यातील बहुतांश इमारती मोडकळीस आल्या असून काही धोकादायक म्हणूनही जाहीर झाल्या आहे. चटई क्षेत्रफळ नियमाचे उल्लंघन केल्यामुळे अशा इमारतींचा पूनर्विकास होऊ शकत नव्हता. यासाठी राज्य सरकारने मिरा-भाईंदरमध्ये दोन अडीच वर्षांपूर्वी क्लस्टर योजना लागू केली. यामुळे धोकादायक, अनधिकृत इमारती, तसेच झोपडपट्ट्यांचा पूनर्विकास होईल, असा दावा केला जात होता, मात्र गेल्या दोन वर्षांत काही भागात क्लस्टर योजनेसाठी झालेले सर्वेक्षण वगळता योजना पुढेच सरकलेली नाही.

भाईंदर पश्चिम येथील देवचंद नगर भागातील राणी सती धाम परिसरातील इमारतींचा क्लस्टर योजनेत समावेश आहे. या परिसरात १४ ते १५ इमारती आहेत व त्यात सुमारे आठशे कुटुंब राहतात. या सर्व इमारती ग्रामपंचायत काळात बांधण्यात आल्या असून त्यांना ३५ ते ४० वर्षे झाली. यातील काही इमारती धोकादायक घोषित करून महापालिकेने रिकाम्यादेखील करून घेतल्या आहेत, तर काही इमारती तोडण्यात आल्या आहेत. काही इमारती मोडकळीस आल्यामुळे त्यांना महापालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काही इमारतींनी दोन वर्षांपूर्वी स्वतंत्रपणे पूनर्विकासाचे प्रस्ताव महापालिकेकडे सादर केले आहेत. परंतु हा परिसर क्लस्टरमध्ये समाविष्ट असल्याने इमारतींचे स्वतंत्र प्रस्ताव मंजूर केले जाऊ शकत नाहीत, असे कारण देऊन महापालिकेने पूनर्विकासला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ज्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत, त्यातील व ज्या इमारती रिकाम्या केल्या जाण्याच्या तयारीत आहेत, त्यातील रहिवाशांच्या भवितव्यासमोर मोठेच प्रश्नचिन्ह लागले असून आम्ही जायचे कोठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

या भागातील काही इमारतींचे क्लस्टर अंतर्गत सर्वेक्षण झाले आहे. परंतु त्यानंतर महापालिकेकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात सुरू होईल का, याबाबतच रहिवाशांना साशंकता आहे. रहिवाशांनी या समस्येवर लोकप्रतिनिधींकडेही पाठपुरावा केला आहे. मात्र केवळ आश्वासनांव्यतिरिक्त त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे क्ल्स्टरही नाही व इमारतींचा पुनर्विकासही नाही, अशा विचित्र परिस्थित रहिवासी भरडले जात आहेत.

रहिवासी अडकले कात्रीत
क्लस्टर योजनेत परिसरातील सर्वच इमारतींचा एकत्र पूनर्विकास केला जात असून एका इमारतीला स्वतंत्रपणे बांधकाम परवानगी दिली जात नाही, परंतु क्लस्टर योजनाही सुरू केली जात नाही व इमारतीला स्वतंत्र बांधकाम परवानगीही दिली जात नाही, अशा कात्रीत रहिवासी अडकले आहेत. त्यामुळे क्लस्टर योजना आम्हाला नकोच, अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.

क्लस्टर योजना रहिवाशांच्या हिताची नाही, ती सुरू होईल की नाही, याची शाश्वती नाही. राणी सती धाम परिसरातील रहिवाशांनी क्लस्टर हटाव आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच यासाठी रहिवाशांची समिती स्थापन करून संघर्ष सुरू केला जाईल. आवश्यकता भासली तर आगामी महापालिका निवडणुकीवर बहिष्कारदेखील टाकला जाईल.
- नितीन मेस्त्री, स्थानिक रहिवासी

क्लस्टर योजनेतील त्रुटींसंदर्भात राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या सचिवांसोबत दोन वेळा बैठक घेतली, मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे रहिवाशांनी घेतलेल्या भूमिकेसोबत ठामपणे उभे रहाणार आहोत व त्यांच्यासोबत आंदोलनातही सहभागी होणार होणार आहोत.
- नरेंद्र मेहता, आमदार, मिरा-भाईंदर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com