विरोधकांच्या हाती नालेसफाईचे हत्यार

विरोधकांच्या हाती नालेसफाईचे हत्यार

Published on

नालेसफाईच्या कामांची पोलखोल
दिरंगाईमुळे महाविकास आघाडी आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : पावसाळा तोंडावर आलेला असताना केवळ ५१ टक्के नालेसफाई झाल्याची कबुली ठाणे महापालिका प्रशासनाने दिल्याने विरोधकांच्या हाती आयते हत्यार मिळाले आहे. त्यात अवकाळी पावसानेही भर टाकत नालेसफाईची हातसफाई उघडकीस आणली आहे. ही संधी साधत गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने नालेसफाईच्या कामांची पोलखोल करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर थंडावलेल्या महाविकास आघाडीला ‘मिशन नालेसफाई’च्या निमित्ताने आक्रमक पवित्रा घेण्याचा ‘कार्यक्रम’ मिळाला असून, त्यातून पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाला घेरण्याची तयारी सुरू झाली आहे.

मॉन्सूनपूर्व नालेसफाईला ठाण्यात सुरुवात होऊन आता महिना उलटत आला आहे. १० प्रभाग समित्यांसाठी १० ठेकेदार महापालिकेने नालेसफाईसाठी नियुक्त केले आहेत. पण कामाच्या दर्जासह नाल्यातून उपसलेल्या गाळापर्यंत रोज टीकेची झोड उठत आहे. त्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असल्याने नाल्यातील पाणी रहिवाशांच्या घरात शिरण्याचे प्रकारही वाढले आहेत. याच मुद्द्यांवरून सध्या ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ठाणे महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती असला तरी सत्ताधारी पक्षाचा ‘अदृश्य’ कारभार प्रशासकाच्या आडून सुरू असल्याचा आरोप होत आहे. याविरोधात आधी भाजपने आक्रमक भूमिका घेत नालेसफाईच्या कामांची पोलखोल करणारा पाहणी दौरा केला. आता त्या मार्गावर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानेही मोर्चा उघडला आहे. ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी नालेसफाईचा पाहणी दौरा करीत पालिका अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही आता नालेसफाईचा दौरा करीत संपूर्ण यंत्रणेला खिंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे.

वास्तविक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, शिवसेना ठकारे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट हे महाविकास आघाडीचे प्रमुख घटक ठाण्यात विखुरले होते. रोजच पक्षांतरण घडत असल्यामुळे या तिन्ही पक्षांची ताकद खिळखिळी होऊन अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे ठाणे महापालिकेवर महापौर कोणत्या पक्षाच्या यावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना महाविकास आघाडी मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत होती. कार्यकर्त्यांच्या हातालाही कार्यक्रम नसल्यामुळे त्यांच्यात चलबिचल होती. पण आता नालेसफाईमुळे महाविकास आघाडीला आगामी महापालिका निवडणुकीचे वातावरण तयार करण्याची संधी मिळाली आहे. त्यातून केवळ पालिका प्रशासनाला नव्हे तर सत्ताधारी शिवसेना शिंदे गटालाही घेरण्याची रणनीती आखली जात आहे. यावरून राजकीय आखाडा रंगण्यास सुरुवात झाली असून, त्याची पहिली ठिणगी शनिवारी राबोडीत पडल्याचे पाहायला मिळाले.

राबोडी नाल्यासमोर ‘राडा’
नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे राबोडी येथील रहिवाशांच्या घरात पाणी घुसले. हे कळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी राबोडी नाल्याची पाहणी केली. त्याचवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक माजी नगरसेवक नजीब मुल्ला तेथे दाखल झाले. या वेळी या गुरू-शिष्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे हे दोन्ही गट समोरासमोर असणार असून, दोघांसाठीही हा कसोटीचा काळ आहे.

ठेकेदारांवर कारवाईची कुऱ्हाड
विरोधकांनी नालेसफाईवरून पालिका प्रशासनाला धारेवर धरण्यास सुरुवात केल्यामुळे आता याचे खापर ठेकेदारांवर फोडण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेने नालेसफाई करणाऱ्या ठेकेदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. तसेच दिलेल्या मुदतीत शंभर टक्के नालेसफाई न झाल्यास किंवा त्रुटी आढळल्यास ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची तंबीही दिली आहे. वास्तविक बिले वेळेत मिळत नसल्यामुळे यंदा नालेसफाईचे कंत्राट घेण्यासाठी ठेकेदारांनी आखडता हात घेतला होता. आधीच बिले उशिरा मिळतात, त्यात ‘वाटप’ जास्त असल्याने त्याचा परिणाम कामावर होत असल्याचा आरोप आता ठेकेदारांकडूनही होऊ लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com