मुंबई- पुणे द्रुतगतीला अपघातांचे ग्रहण

मुंबई- पुणे द्रुतगतीला अपघातांचे ग्रहण
Published on

मुंबई-पुणे द्रुतगतीला अपघातांचे ग्रहण
अवजड वाहनांमध्ये लेन शिस्तीचा अभाव; ठोस उपायोयाजनांची मागणी
खालापूर, ता. २५ (बातमीदार) ः मुंबई-पुणे द्रुतगतीवर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शनिवारी (ता. २४ मे) संध्याकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लेनची शिस्त मोडून बेदरकारपणे कंटेनर चालवत कारला धडक देण्यात आली. यामध्ये दोन जणांचा बळी आणि सहा जण गंभीर जखमी झाले. अवजड वाहनांमध्ये लेन शिस्तीचा अभाव दिसून येत असल्याने त्‍यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
मागील काही वर्षांपासून मुंबई-पुणे द्रुतगतीवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये अवजड वाहनांची संख्या लक्षणीय आहे. मात्र दिवसेंदिवस वाहतुकीचे नियम मोडले जात असल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये अवजड वाहनांकडून मोठ्या प्रमाणात लेनची शिस्‍त न पाळणे, ओव्‍हरटेक करणे, प्रमाणाबाहेर वाहन लोड करणे असे प्रकार सर्रास होत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येताना बोरघाटातील आडोशी टप्पा अपघातामुळे कायम चर्चेत राहिला आहे. उताराचा रस्ता असल्यामुळे वाहनांच्या गतीवर नियंत्रण यावे, यासाठी घाट उतरताना हलक्या वाहनांसाठी ५० किमी प्रतितास तर अवजड वाहनांसाठी ४० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा आहे, परंतु सर्रासपणे वेगमर्यादेचे उल्लंघन वाहनचालक करतात. याशिवाय लेनच्या शिस्तीचा अभाव कायम दिसून आला आहे. अवजड वाहन ओव्हरटेकसाठी असणाऱ्या लेनचा सर्रास वापर करीत असल्याने हलक्या वाहनांसाठी कायम धोकादायक ठरत आहे. शनिवारचा अपघातदेखील कंटेनरचालकाकडून लेनची शिस्त मोडल्याने झाला होता. त्‍यामुळे वाहतूक पोलिसांकडून द्रुतगती मार्गावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
..........................
अवजड वाहने, हलकी वाहने आणि ओव्हरटेक करण्यासाठी तीन लेनची रचना आहे. खालापूर तालुका हद्दीत घाट उतरून मुंबुईकडे जाताना आडोशी उतार अपघाताचा हाॅटस्पाॅट बनला आहे. घाट उतरताना वेगमर्यादेचे पालन वाहनचालकांकडून करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. इंधन वाचविण्यासाठी अवजड वाहनचालकांकडून वाहन न्यूट्रल ठेवले जाते. यामुळे अनेकदा ब्रेक न लागल्यामुळे अपघाताचे कारण ठरत आहे. इंधन बचतीच्या नादात अवजड वाहनचालकांकडून न्यूट्रल गिअरमुळे उतार व वळणावर वाहन अनियंत्रित होते. बंद पडलेले वाहन हेदेखील अपघाताचे कारण ठरत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातप्रवण पट्ट्यात घाटातून मुंबईच्या दिशेने जाताना खालापूर टोलनाक्यापर्यंत साधारण आठ किलोमीटरची चौथी लेन तयार करण्यात आली आहे. ही लेन केवळ अवजड वाहनांच्या वापरासाठी ठेवण्यात आली आहे; परंतु लेनची शिस्त पाळली जात नसल्याने अपघात वाढले आहेत. मिसिंग लिंकमुळे अपघात पट्टा वगळला जाणार असून, वेळेत बचत होणार आहे. मिसिंग लिंक लवकर तयार होण्याची नितांत गरज आहे.
............
कोट
शनिवारी अपघात हा लेनची शिस्त न पाळल्याने झालेला. दोन बस आणि अपघात करणारा अवजड ट्रेलर अशी वाहने तिसऱ्या लेनमध्ये होती. अशा वाहनांवर कारवाई झाली तर जीवघेणे अपघात टाळता येतील.
- गुरुनाथ साटेलकर, हेल्प फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com