स्मशानभूमीच्या भिंती झाल्या बोलक्या

स्मशानभूमीच्या भिंती झाल्या बोलक्या
Published on

अंबरनाथ, ता. २५ (बातमीदार) : जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या रंजक आकर्षक चित्रांद्वारे अंबरनाथमधील स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचे रूपडे चित्रकाराच्या कुंचल्यातून पालटण्यात आले आहे. चित्रकार मोहन जगताप यांनी स्मशानभूमीच्या बाहेर आणि आतील परिसरातील भिंतीवर दुःखातही सुख कसे शोधता येईल, या संकल्पनेवर आधारित मानवाच्या जीवनातील जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या १६ संस्काराचा प्रवास रंगीत चित्रांद्वारे उभा केला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून चित्रकार जगताप यांनी साकारलेली ही चित्रे मृत्यूच्या नकारात्मकतेला दूर करत, जणू जीवनाकडे नव्याने पाहण्याचा दृष्टिकोन देतात. मनुष्याच्या जीवनातील सोळा संस्कार, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास, अध्यात्म, संत तुकाराम महाराज, वारकरी आणि विठुराया, पर्यावरण, जीवसृष्टी यासह पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश या चित्रांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रांमुळे स्मशानभूमीत आनंदी, प्रसन्न, शांतीचे प्रफुल्लित वातावरणात निर्माण झाले आहे. दुःखात देखील सुख कसे शोधता येईल अशी संकल्पना राबविण्यात आली असल्याचे चित्रकार मोहन जगताप यांनी सांगितले. मागील सोमवारपासून भिंतीवर कलाकुसर करण्यास सुरुवात केली असून येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. दरम्यान, येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या नाट्यगृहासमोरील भिंतीवर मोहन जगताप यांनी नाट्य परंपरेचा इतिहास चित्रांद्वारे साकरला होता.

रंगछटांनी उजळली
चित्रकार जगताप यांच्या कुंचल्यातून अंबरनाथ पश्चिमेच्या हिंदू स्मशानभूमीतील भिंती बोलू लागल्या आहेत. जगताप यांनी रेखाटलेल्या आकर्षक चित्रांच्या जादूने स्मशानभूमीतील प्रत्येक भिंत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधू लागली आहे. रंजक चित्रांच्या माध्यमातून जीवनाचे अर्थ सांगणारी आकर्षक कलाकृती पाहून भयावह वाटणारी स्मशानभूमी आता रंगछटांनी उजळून निघाली आहे. एकेकाळी मृत्यूची शांतता आणि भीतीदायक वाटणारी स्मशानभूमी आता जीवनातील सकारात्मक संदेशात रूपांतरित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com