

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा
काँक्रीटीकरण पूर्ण होण्याआधीच दुरुस्तीची नामुष्की
मनोर, ता. २४ (बातमीदार) ः सहाशे कोटी खर्चून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण केल्यानंतरही त्याची दुर्दशा कायम आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, काँक्रीट उखडण्यास सुरुवात झाली आहे. समतल पृष्ठभाग राखण्यात अपयश आल्याने वाहनांचे टायर फुटून अपघात आणि वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काँक्रीटचे काम पूर्ण होण्याआधीच दुरुस्तीचे काम सुरू करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.
सहाशे कोटी खर्चून केलेले निकृष्ट दर्जाचे काँक्रीटीकरण आणि दुरुस्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूने मुंबई-अहमदाबाद महामार्गाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूने महामार्ग प्राधिकरणाची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने सुरतला हलवलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प कार्यालय ठाण्यात आणले. मुंबईच्या वेशीपासून गुजरातचा सीमाभाग असलेल्या अच्छाडपर्यंतच्या १२० किलोमीटर लांबीच्या अंतराचा भाग ठाणे प्रकल्प कार्यालयाअंतर्गत आणण्यात आला. त्यानंतर महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासह अपघात प्रवण क्षेत्र दूर करून वाहन चालक आणि प्रवाशांना सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्याचा घाट घालण्यात आला. महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच दुरुस्तीचे काम सुरू करण्याची नामुष्की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर आली आहे. दुरुस्तीसाठी चार चौरस फुटांचे १० हजार ब्लॉक निश्चित करून काम सुरू करण्यात आले आहेत. मायक्रो काँक्रीट आणि ईपॉक्सी सोल्युशनचा वापर करून उच्च दर्जाची दुरुस्ती केल्याचा ठेकेदाराचा दावा महिनाभरात फोल ठरला आहे. खड्डे दुरुस्तीच्या ठिकाणचे मायक्रो काँक्रीट उखडायला सुरुवात झाल्याने व्हाइट टॉपिंगसह दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.
.............
सुमारे सहाशे कोटी रुपये खर्चातून घोडबंदर ते अच्छाडपर्यंतच्या १२० किलोमीटर लांबीच्या महामार्गावर विविध दुरुस्तीची कामे करण्यात आली. यामध्ये व्हाइट टॉपिंग, नऊ ठिकाणी लोखंडी पादचारी पूल आणि चार उड्डाणपुलांची कामे प्रास्तावित करून डिसेंबर २०२३ मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनशून्य कामामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला आहे. व्हाइट टॉपिंगचे काम पूर्णत्वाच्या दिशेने असताना काँक्रीटच्या रस्त्यावर खड्डे पडू लागल्याने त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.