

गुणकारी शेवळ विक्रमगडच्या बाजारात दाखल
रानभाजीमुळे आदिवासी शेकऱ्यांना मिळतोय रोजगार
विक्रमगड, ता. २४ (बातमीदार) ः आरोग्यवर्धक, गुणकारी अशी पावसाळ्यापूर्वी उगवणारी शेवळ ही रानभाजी विक्रमगडच्या बाजारात दाखल झाली आहे. या रानभाजीमुळे जंगल पट्टीतील आदिवासी बांधवांना रोजगार प्राप्त होत आहे.
अतिशय सकस व रुचकर असलेल्या शेवळ या रानभाजीला बाजारात खूप मागणी आहे. मागील वर्षी २० रुपयांनी मिळणारी एक जुडी आता ३० ते ४० रुपयांना आहे. अनेक आदिवासी महिलांना ही भाजी विकून दोन पैसे हाती मिळत आहेत. जंगल भागात उगवणाऱ्या या शेवळांचा जेमतेम एक महिना कालावधी असून, अत्यंत पौष्टिक, रुचकर व औषधी भाजी म्हणून जेवणात वापर केला जातो. खासकरून पावसाआधी मिळणारी शेवळ ही विशेष गुणधर्म युक्त असल्याचे आदिवासी बांधवांकडून बोलले जाते. त्यामुळे या भागातील खवय्ये पावसा अगोदरची शेवळ जास्त प्रमाणात खरेदी करून ती उन्हात सुकवून जमा करतात व वर्षभर वापरतात, मात्र या शेवळ्यांबरोबर आवळ्यासारखी दिसणारी काकड घेणे जरुरीचे आहे. त्याशिवाय ही भाजी करताच येत नाही. अशी ही वर्षातून एकदाच मिळणारी शेवळ भाजी काकडांसह बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे अनेक नाक्यांवर, बाजारात आदिवासी, शेतकरी व वनसंपदेवर जीविका करणारे विक्रेते ही भाजी विकताना दिसून येत आहेत. सध्या बाजारात काकडांसह ४० रुपयांना शेवळ्याची जुडी मिळत आहे. पावसाळा सुरू झाल्यावर हा भाव कमी होऊन २० ते २५ रुपयांना जुडी मिळते. तूर्तास तरी खवय्ये उपलब्ध झालेल्या या रानभाजीचा आस्वाद घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.