

एमआयडीसीमधील रात्रीचा प्रवास धोकादायक
पथदिवे बंद असल्याने चाकरमान्यांची गैरसोय; महिलावर्गात असुरक्षितता
वाशी, ता. २४ (बातमीदार) ः एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांसह वाहनचालकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी पथदिवे बंद असून काही ठिकाणी ते झाडांच्या आड गेल्याने अंधूक प्रकाशामुळे चालताना प्रवाशांना टॉर्चचा उपयोग करावा लागत आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाने येथील बंद असलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.
एमआयडीसीमध्ये बहुद्देशीय कंपन्या असून मोठ्या प्रमाणात कॉल सेंटरचे जाळे उभे राहिले आहे. यामध्ये नवी मुंबईसह, मुंबई, ठाण्यातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात नोकरीनिमित्त येतात.
दिघ्यापासून शिरवणेपर्यंत विस्तीर्ण आशा या टीटीसी औद्योगिक वसाहतीमध्ये हजारो कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याची सुधारणा केली असली तरी अजूनही अंतर्गत मार्गांची दुरवस्था झालेली पहावयास मिळत आहे. त्यामुळे येथून प्रवास नकोसा झाला आहे. दिवसाही प्रवास करणे कठीण होत असताना, आता प्रकाशाअभावी रात्रीचा प्रवास अधिक खडतर झाला आहे. एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यावर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने अंधारातून जीव मुठीत घेऊन दुचाकीचालकांना प्रवास करावा लागत आहे. दिघा ते शिरवणे भागात सुमारे दोन हजार पथदिवे आहेत. यात महापे, रबाळे, खैरणे भागात एक हजार तर तुर्भे-शिरवणे या भागात ९५० पथदिवे आहेत. मात्र यातील अनेक पथदिवे बंद असल्याने चाकरमान्यांसह स्थानिकांची गैरसोय होत आहे. तर काही दिव्यांचा प्रकाशच रस्त्यावर पडत नसल्याने अनेकांना टॉर्चचा वापर करावा लागतो. तुर्भेतील सविता केमिकल्स, फायझर रस्ता या ठिकाणी अत्याधुनिक आणि चांगल्या अवस्थेतील पथदिवे बसविण्यात आली आहेत, मात्र अनेकदा हे सुद्धा पथदिवे बंद असतात. अनेक महिला कर्मचाऱ्यांना हा प्रवास असुरक्षित वाटतो. त्यामुळे अंधार पडण्याआधीच ठाणे-बेलापूर महामार्ग गाठावा लागतो, असे अनेकांनी सांगितले. यामध्ये अंधाराचा गैरफायदा घेत चोरीचे प्रकारही होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.