विरारमध्ये म्हाडा रहिवाशी आक्रमक

विरारमध्ये म्हाडा रहिवाशी आक्रमक
Published on

विरारमध्ये म्हाडा रहिवासी आक्रमक

न्यू सातारा बँकेबाहेर नागरिकांचा आंदोलनाद्वारे आक्रोश

बोळींज, ता. २५ (बातमीदार) : विरार पश्चिमेला म्हाडा इमारतीत गेल्या अनेक महिन्यांपासून समस्यांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. नागरिकांना घर मिळाले, परंतु पाणी आणि विजेसारखी सुविधा नसल्याने नागरिक हैराण झालेले आहेत. त्यातच आता न्यू सातारा बँकेतर्फे कमी किमतीमध्ये घरे विकली जात आहेत. परिणामी पाण्याची समस्या अधिकच वाढणार आहे. न्यू सातारा बँकेने नागरिकांना फसवून घर विकल्याचा आरोप करीत येथील म्हाडा रहिवाशांनी रविवारी (ता. २५) सायंकाळी या बँकेच्या म्हाडा कार्यालयावर आंदोलन करीत आक्रोश व्यक्त केला.

म्हाडाची लॉटरी लागल्यानंतर २०१८ पासून नागरिकांनी २८ लाख ४६ लाख इतक्या रकमेच्या सदनिका विकत घेतल्या. परंतु म्हाडाच्या समस्यांमुळे घरांची विक्री होत नसल्याने न्यू सातारा बँकेतर्फे हीच घरे २० लाख ३६ हजारांना विकली जात आहेत. आतापर्यंत दोन हजार घरे विकली गेली आहेत. या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमुळे अधिकच पाण्याची टंचाई निर्माण होईल, अशी भीती येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे. सध्या येथील दोन हजार घरांना २० लाख लिटर पाणी मिळत आहे. या पाण्यासाठी येथील नागरिकांनी अनेक मोर्चे काढून आंदोलने केली. या ठिकाणी आणखी दोन हजार घरांसाठी नळजोडणी आवश्‍यक आहे. परंतु नळजोडणीआधीच या सदनिका विकल्याचा आरोप या वेळी स्थानिकांनी केला. त्यातच न्यू सातारा बँकतर्फे डिसेंबर, जानेवारीमध्ये ज्यांनी घरे घेतली आहेत त्यांनादेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याविरोधात आधी नळजोडणी आणि पाणी द्या, अशी मागणी करीत नागरिकांनी न्यू सातारा बँकेच्या म्हाडा कार्यालयाबाहेर मोर्चा काढला. या वेळी म्हाडा संकुल समितीतर्फे न्यू सातारा बँकेला पत्र देण्यात आले आहे.


न्यू सातारा बँक घरांची विक्री करते, पण सुविधांचे काय? प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. म्हणूनच घरे स्वस्त झाली आहेत. म्हाडाने मागण्या मान्य केल्या नाही तर आणखी आक्रमक आंदोलन केले जाईल.
- शिवाजी कल्याणकर, स्थानिक रहिवासी

आम्ही पाण्यासाठी खूप आंदोलने केली. त्यामुळे आता २० लिटर पाणी मिळाले आहे. आता यापेक्षा जास्त नागरिक वाढले तर त्यांना आणखी पाणी लागेल. ते देण्यास म्हाडा सक्षम नाही. म्हाडा अधिकारी जबाबदारी घेत नाहीत.
- नमिता देवाडिगा, स्थानिक रहिवासी

- मी एक महिना झाले ‘म्हाडा’मध्ये राहायला आलो. चार दिवसांत फक्त पाच मिनिटे पाणी येते. न्यू सातारा बॅंकेतर्फे घर घेतले त्या वेळेस त्यांनी पाणी भरपूर असल्याचे सांगितले होते; पण आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
- विवेक दुबे, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com