मच्छिमारांचे आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष !

मच्छिमारांचे आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष !

Published on

मच्छीमारांचे आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष!
गुजरातमध्ये मासेमारीबंदीच्या कालावधीत वाढ

भाईंदर, ता. २६ (बातमीदार) : गुजरात सरकारने मासेमारीबंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. राज्यातील मच्छीमारांनीदेखील मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे मासेमारीबंदीचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.

पावसाळ्यातील मासेमारीबंदीचा कालावधी १ जून ते ३१ जुलै असा होता. या पार्श्वभूमीवर इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन फेडरेशनच्या महाराष्ट्र व गुजरातमधील मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने ८ एप्रिलला गुजरातचे मत्स्योद्योग मंत्री राघवजीभाई पटेल यांची भेट घेत कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याची मागणी केली. त्यानंतर मच्छीमारांनी नितेश राणे यांचीदेखील भेट घेऊन त्यांनाही याबाबत विनंती केली होती. त्यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन राणे यांनी दिले होते. गुजरातमध्ये आश्वासनानुसार मासेमारीबंदीचा कालावधी वाढविण्याचे आदेश नुकतेच जारी केले. त्यामुळे गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मच्छीमार करत आहेत.

राज्यात मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने मच्छीमारांनी गेल्या वर्षी स्वतःहून मासेमारी बंदीचा कालावधी वाढवून घेतला होता. गेल्या वर्षी उत्तन, वसई व पालघरमधील मच्छीमारांच्या संघटना एकत्र येऊन त्यांनी मासेमारीची सुरुवात १ ऑगस्टपासून न करता १५ ऑगस्टपासून केली. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन समुद्रातील मासळीच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

गुजरात सरकारने घेतलेल्या निर्णयाची प्रत राज्य सरकारकडे देण्यात आली आहे. नितेश राणे यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णयाचे आश्वासन याआधी दिले आहे. त्यानुसार राज्य सरकारही गुजरातप्रमाणेच निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.
- बर्नड डिमेलो, कार्याध्यक्ष अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

मासेमारीबंदीचा कालावधी वाढविण्याची आवश्यकता
पश्चिम किनारपट्टीवरील मासळीसाठा झपाट्याने कमी होत आहे. केंद्रीय मत्स्यकी संशोधन केंद्राच्या २०१८ च्या अहवालानुसार एकूण ५८ मासळी प्रजाती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. ज्यामध्ये घोळ, पापलेट, कोळंबी, शिवंड, चिंबोरे, हलवा, माकुल, टायनी, कापशी, गोईनार, फटफटी, मुशी, कट बांगडा, पाखट, टेली बांगडा, फलई, तारली, मांदेली, बांगडा, सुरमई, तूवार, टूना, टोक, पोपट, हेकरू, चार बोंबील, धुमा, लेप आणि शिंगाडा ह्यांच्या प्रजाती अनियंत्रित मासेमारीमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मत्स्यबीज वाढीसाठी पुरेसा कालावधी न मिळणे हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे. परिणामी मच्छीमारांना मासळीच्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. हा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवल्यास मासळीच्या साठ्यात लक्षणीय वाढ होते, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com