मच्छीमारी व्यवसायाला मोठा फटका

मच्छीमारी व्यवसायाला मोठा फटका
Published on

तुर्भे, ता. २७ (बातमीदार) : राज्यात अवकाळी पावसाचा फटका जसा शेतकऱ्यांना बसत आहे, तसाच फटका नवी मुंबई, मुंबई, ठाणे येथील समुद्र किनारपट्टीलाही बसत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांसह मच्छीमारी व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हंगाम बंद होण्यापूर्वीच मासेमारी बंद झाल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी मासळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
मुंबई, तसेच आसपासच्या समुद्रात चक्रीवादळ घोंघावण्याची दाट शक्यता असल्यामुळे २५ मेपासूनच मच्छीमार बांधवांनी बोटी समुद्रात न नेण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी मासळी बाजारात मासे महागले आहेत. काही दिवस आधीच मासेमारी बंद केल्यामुळे आर्थिक नुकसान होणार असल्याची चिंता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ताज्या मासळीची आवक घटून मासळीचे भाव वाढले आहे. नवी मुंबईतील खाडीकिनारी मिळणारी मासळी ही पावसामुळे कमी प्रमाणात मिळू लागली आहे. सध्याच्या पावसाचा फटका हा समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातीला बसला आहे. त्यात भाऊच्या धक्क्यावरून येणारी मासळीदेखील बंद झाल्याने खवय्यांना सुक्या मासळीवर ताव मारावा लागत आहे. पावसामुळे नवी मुंबई शहरातील मच्छीमारांनी आपल्या बोटी खाडीकिनारी नांगरून ठेवल्या आहेत. त्यामुळे जी मासळी मिळेल, ती सोन्याच्या भावाने विकली जात आहे.
------------------
सध्याचे मासळीचे किलोचे भाव (रु.)
पॉपलेट १,८००
सुरमई १,५००
घोळ १,५००
हलवा १,२००
कोळंबी ८००
जिताडा ७००
बोंबील २०० (६ नग)
बांगडे २०० (५ नग)
---------------------
माशांच्या प्रजातींचे जतन होण्यासाठी, तसेच पावसाळ्यात मच्छीमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत सरकार मान्यतेनुसार पावसाळी मासेमारी बंद असते. त्यामुळे १५ दिवस आधीपासून सर्व मासेमारी साहित्यासह होड्यांची देखरेख करण्याची पूर्वतयारी केली जाते; मात्र यंदा लवकरच हजेरी लावलेल्या पावसामुळे काहीही व्यवस्था न करता होड्या नांगरून ठेवण्याची वेळ आली आहे.
- नीलकंठ गझणे, दिवाळे कोळीवाडा, मच्छीमार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com