उल्हासनगर ऑनलाइन क्रिकेट सट्ट्याच्या दलदलीत

उल्हासनगर ऑनलाइन क्रिकेट सट्ट्याच्या दलदलीत

Published on

उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : आयपीएलचा हंगाम रंगात असतानाच उल्हासनगरमध्ये सट्टेबाजीचा गोरखधंदाही जोमात सुरू आहे. ऑनलाइन आयडीच्या माध्यमातून युवकांना सट्ट्याच्या विळख्यात ओढण्याचे जाळे इतके मजबूत झाले की, स्थानिक पोलिसांच्या नजरेतून ते सुटत आहे. ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या शाखेने नुकत्याच उघडकीस आणलेल्या कारवाईने या काळ्या धंद्याच्या खोल रचना उघड केल्या आहेत. जिथे पैसा, तंत्रज्ञान आणि युवकांचा भविष्य एकत्र जळत आहेत.
एकीकडे आयपीएल २०२५ अंतिम टप्प्यात पोहोचले असताना दुसरीकडे उल्हासनगरमध्ये क्रिकेट सट्टेबाजीचा गैरप्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक युवक या सट्टेबाजीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यातून त्यांची मानसिक, आर्थिक आणि सामाजिक वाताहत होत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांनी यावर अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. परिणामी, ठाणे गुन्हे शाखेसारख्या बाह्य यंत्रणांना हस्तक्षेप करावा लागत आहे.
ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने उल्हासनगर कॅम्प नंबर १ झुलेलाल मंदिर रोड परिसरात एक युवक यश संतवानी (वय २१) याला अटक केली. यश हा क्रिकेट सट्ट्यासाठी ऑनलाइन युजर आयडी देण्यासाठी एम. के. हार्डवेअर दुकानाजवळ आला असताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी महिला पोलिस अधिकारी मयूरी भोसले यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. एल. राठोड करत आहेत. दरम्यान, उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडून ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक पोलिस दलाने जर वेळेत आणि प्रभावी भूमिका बजावली असती, तर बाह्य यंत्रणांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली नसती, असे जाणकारांचे मत आहे.

सट्टेबाजारात नामांकित चेहरे
शहरातील अनेक नामांकित चेहरे सट्टेबाजीत सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे सर्वजण ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आयडी, पासवर्डच्या स्वरूपात सट्टा खेळवतात आणि आपल्या नेटवर्कमार्फत शहरभर व्यवहार नियंत्रित करतात.

पालकांनीही सतर्क राहण्याची गरज
सट्टेबाजीचा दुष्परिणाम थेट शहरातील तरुणांवर होत आहे. अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत. काहींनी आत्महत्येचा मार्गही निवडला आहे. महाविद्यालयीन मुले यात ओढले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. घरातील पैसे चोरी करून सट्टा लावणाऱ्या मुलांची संख्या वाढत असल्याने पालकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com